मनोहर शिंदे, (नाशिक) २७ ऑगस्ट - नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरात महाराष्ट्र राज्यातील अनेक पर्यटक अडकले असून त्यांच्या सुरक्षित शोधासाठी आणि मदतीसाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या माध्यमातून नेपाळ प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
४५ पर्यटकांचा गट सुखरूप, प्रशासनाकडून शोधकार्य सुरू
नेपाळ व कैलास मानसरोवर यात्रेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या पर्यटकांमध्ये ४५-४५ जणांचे दोन प्रमुख गट आहेत. यातील एका गटाशी संपर्क झाला असून ते सर्वजण सुखरूप आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून केंद्र सरकारशी समन्वय साधत आहेत.
राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या भागातून नेपाळ आणि कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या नागरिकांची सविस्तर माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी २४ तास अलर्ट मोडवर असून पर्यटकांचा शोध व संपर्काचे काम वेगाने सुरू आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मदत आणि संपर्क यंत्रणा
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या विनाशकारी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अडकलेल्या नागरिकांना आणि पर्यटकांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पोर्टल व संपर्क क्रमांक जारी केले आहेत.
माहिती नोंदवण्यासाठी अधिकृत लिंक : geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf
टोल फ्री मदत क्रमांक : 1077
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता वरील लिंकवर जाऊन किंवा टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून खालील माहिती नोंदवावी:
पर्यटकाचे पूर्ण नाव व मोबाईल क्रमांक
नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेलचा पत्ता
प्रवासाचा तपशील (बस/वाहन क्रमांक)
महाराष्ट्रातील नातेवाईकांचा संपर्क क्रमांक