येवला, (प्रतिनिधी) २७ ऑगस्ट - ‘क्लीन येवला, ग्रीन येवला’ हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून सातत्यपूर्ण चळवळ बनविण्याची गरज आहे. स्वच्छता आणि हरित संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून येवला शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. तसेच विकासासोबत पर्यावरण संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असून प्रत्येकाने झाडांची जबाबदारी स्वीकारावी असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
येवला नगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विश्वलता महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्लीन येवला, ग्रीन येवला’ या पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गत येवला शहरातील आनंद नगर परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. स्वच्छ, सुंदर आणि हरित येवला घडविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी ते बोली होते.
यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगासमोर अनेक गंभीर संकटे निर्माण होत आहेत. बदलते हवामान, वाढते तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यांचा परिणाम सर्वच घटकांवर होत आहे. त्यामुळे प्रदूषणाला आळा घालणे, मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आणि लागवड केलेल्या झाडांचे योग्य संगोपन करणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. केवळ वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करून ते जगविण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील झाडांची काळजी घेतली, तर येवला शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक होण्यास निश्चितच मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
विकासकामांमध्ये पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याचे उदाहरण देताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये उड्डाणपुलाची निर्मिती करताना रस्त्याच्या कामात येणाऱ्या मोठ्या वडाच्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. त्यानंतर या झाडांचे योग्य संगोपन करून ती जगविण्यात आली. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे शक्य असून त्यासाठी इच्छाशक्ती आणि नियोजनाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “विकासाची कामे करताना काही झाडे तोडावी लागली, तर त्याची भरपाई म्हणून केवळ औपचारिक वृक्षलागवड न करता त्यापेक्षा दुप्पट झाडे लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे. पर्यावरण ही केवळ शासनाची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
येवला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधताना मंत्री छगन भुजबळ यांनी पर्यावरण संवर्धनालाही सातत्याने प्राधान्य दिले आहे. स्वच्छता, हरित क्षेत्र वाढविणे, वृक्षलागवड आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. येवला शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार ठेवण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येतील, असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.
यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, प्रशांत शिंदे, मकरंद सोनवणे, अल्केश कासलीवाल, भूषण लाघवे, प्रशांत भंडारे, माँटी मथुरे, भाऊसाहेब धनवटे, समाधान जेजुरकर, सचिन सोनवणे, सुमित थोरात, राजू पवार, महेश गादेकर, दिपक गायकवाड, नवनाथ थोरात, दिपक पवार, आदित्य कानडे, गणेश गवळी, राकेश कुंभारे यांच्यासह विश्वलता महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.