दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २७ ऑगस्ट - सिंहस्थ कुंभमेळ्यातील मुख्य शाही पर्वणीच्या काळात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बंद राहणार असल्याच्या उठलेल्या चर्चांना आणि प्रसिद्ध झालेल्या बातम्यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पूर्णविराम दिला आहे. मंदिर बंद ठेवण्याचा किंवा साधू-संतांना दर्शनापासून वंचित ठेवण्याचा कोणताही निर्णय अथवा प्रस्ताव प्राधिकरणाने घेतलेला नाही, असा स्पष्ट खुलासा कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
खुलाशामधील महत्त्वाचे मुद्दे:
परंपरा अखंडित राहणार: साधू-संत, आखाडे आणि भाविकांच्या धार्मिक परंपरेनुसारच शाही स्नानाच्या दिवशी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन होईल. धार्मिक विधी किंवा दर्शनावर कोणतेही निर्बंध घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
गर्दी नियंत्रण आणि सुरक्षिततेचे आव्हान: त्र्यंबकेश्वर मंदिराची सध्याची क्षमता दिवसाला २५,००० भाविकांना दर्शन देण्याची आहे. पर्वणीच्या दिवशी लाखो भाविक येणार असल्याने गर्दीचे नियोजन, भाविकांची सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा विचार करून केवळ नियोजनात्मक चर्चा झाली होती.
चर्चेअंतीच अंतिम निर्णय: भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था कशी असावी, याबाबत देवस्थान, साधू-संत, आखाडे, प्रशासकीय घटक, माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी सविस्तर विचारविनिमय करूनच सर्वसमावेशक आणि योग्य निर्णय घेतला जाईल.
संतुलित नियोजन: कुंभमेळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जपत, परंपरेला धक्का न लावता तसेच भाविकांच्या सुरक्षेचा आणि वाहतूक व्यवस्थेचा समतोल राखून नियोजन केले जात आहे.
कुंभमेळा सुरक्षित, स्वच्छ आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी प्राधिकरण कटिबद्ध असून नागरिकांनी व भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.