मनोहर शिंदे, (नाशिक) २७ ऑगस्ट - नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३५,००० कोटी रुपयांच्या भव्य बजेटवरून राज्यातील राजकारण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या खर्चावरून महायुती सरकारवर विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
"येत्या २ ते ४ दिवसांत मी नाशिक कुंभमेळ्यावर सविस्तर पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणाचा पोलखोल करणार आहे," असा इशारा देत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "प्रयागराज (अलाहाबाद) पेक्षाही मोठा कुंभमेळा नाशिकमध्ये आयोजित करून, 'आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा मोठे नेते आहोत' हे दाखवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रयत्न असल्याचे ऐकिवात आहे."
माजी मुख्यमंत्र्यांचे ३ मोठे सवाल:
१. ३५ हजार कोटींचा खर्च कशासाठी?
"मागील कुंभमेळ्याला साधारण ३ ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च आला होता. मग यंदा थेट ३५ हजार कोटींचे बजेट कसे काय काढण्यात आले? हा जनतेचा पैसा असून तो केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी व टेंडर काढण्यासाठी वापरला जात आहे का?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
२. कुठे आहे डी.पी.आर. (Detailed Project Report)?
शासनाने ६ कोटी भाविक येणार असा दावा केला आहे, पण हा आकडा कुठल्या अभ्यासाच्या आधारे ठरवला गेला? एवढ्या मोठ्या संख्येचा भार नाशिक शहर आणि गोदावरी नदी पेलू शकेल का, याचा कोणताही सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) जनतेसमोर ठेवण्यात आलेला नाही.
३. कंत्राटदारांची घराणेशाही व कमिशनखोरी:
"कंत्राटदारांना ५६ टक्के कमिशन द्यावे लागत असल्यामुळे कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट होत आहे. नाशिकच्या विकासाच्या नावाखाली काही मोजक्याच उद्योगपतींच्या आणि कंत्राटदारांच्या फायद्यासाठी ही उधळपट्टी सुरू आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
जनआंदोलनाचे आवाहन
नाशिकमधील या उधळपट्टीविरोधात आणि निकृष्ट कामांविरोधात नाशिककरांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे आणि जनआंदोलन उभारावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. आगामी पत्रकार परिषदेत ते या कुंभमेळ्याच्या बजेटबाबत आणि निविदा प्रक्रियेबाबत आणखी कोणते नवे खुलासे करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.