नाशिक, (प्रतिनिधी) २६ ऑगस्ट - नंदिनी (नासर्डी) नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि नदीपात्रात प्रक्रिया न केलेले घातक औद्योगिक रासायनिक सांडपाणी जाण्यापासून रोखण्यासाठी सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील 'कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट' (CETP) प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. 'वॉटरमन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी पर्यावरणप्रेमी आणि अधिकाऱ्यांसह या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
२०१५ पासून रखडलेल्या प्रकल्पाबाबत नाराजी
सातपूर आणि अंबड एमआयडीसीतील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प २०१५ पासून प्रलंबित आहे. या विलंबाबाबत डॉ. राजेंद्र सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उद्योगमंत्र्यांकडे पाठपुरावा करून या कामाला गती दिली असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता कोणतीही हयगय न करता काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी एमआयडीसी प्रशासनाला व ठेकेदारांना दिले आहेत.
वेळबद्ध नियोजन: दिवाळीपर्यंत १००% क्षमता
सप्टेंबरच्या सुरुवातीला: CETP प्रकल्पातील सुरुवातीची २ युनिट्स कार्यान्वित केली जातील.
दिवाळीपर्यंत (ऑक्टोबरअखेर): सर्व १० युनिट्स पूर्ण क्षमतेने सुरू करून रासायनिक सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया केली जाईल.
STP च्या जागेचा प्रश्न एका आठवड्यात निकाली निघणार
अंबड-सातपूर परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (STP) आवश्यक जागेचा प्रश्न याच आठवड्यात मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री महाजन यांनी एमआयडीसीचे विभागीय अधिकारी दिलीप पाटील यांना दिले. नदी प्रदूषण रोखण्यासाठी CETP, STP आणि नदी स्वच्छता या सर्व आघाड्यांवर वेळेत काम होणे गरजेचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव सावजी, ओएसडी संदीप जाधव, पर्यावरणप्रेमी राजेश पंडित, चिन्मय उदगीरकर, ज्योती माळसे, रोशन केदार, प्रवीण शिलावत, आदिनाथ ढाकणे, चंद्रकिशोर पाटील, योगेश बरवे, नरेंद्र चुग, विनोद बोधनकर, वृष्णित सौदागर यांच्यासह एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.