साखरेच्या दरात एकाच दिवसात १६०० रुपयांची घसरण... केंद्र सरकार आणि साखर लॉबीमध्ये २०-२२ हजार कोटींचा घोळ?

Share:
Main Image
Last updated: 26-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २६ ऑगस्ट - कालपर्यंत ६,८०० रुपये प्रति क्विंटल या विक्रमी स्तरावर पोहोचलेले साखरेचे दर आज अचानक ५,२०० रुपयांवर खाली आले आहेत. एकाच दिवसात साखरेच्या भावात प्रतिक्विंटल तब्बल १,६०० रुपयांची मोठी घसरण झाल्यामुळे साखर उद्योगात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या अचानक झालेल्या दरकपातीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारसह बड्या साखर सम्राटांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

२० ते २२ हजार कोटींचा ढपला पाडण्याचा डाव?

माजी खासदार राजू शेट्टी यांनी या संपूर्ण घडामोडींवर संशय व्यक्त करत म्हटले की, "देशातील मूठभर साखर व्यापारी आणि बडे साखर कारखानदार केंद्रातील काही वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरून सुमारे २० ते २२ हजार कोटी रुपयांचा ढपला पाडण्याच्या तयारीत आहेत, हे मी वारंवार सांगत आहे. जर केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार देशात साखरेची खरोखरच टंचाई आहे, तर मग एका रात्रीत साखरेचे दर प्रतिक्विंटल १,६०० रुपयांनी खाली कसे आले?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांवर थेट निशाणा

Advertisement

या प्रकरणात राजू शेट्टी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना लक्ष्य केले आहे. "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रल्हाद जोशी यांच्या मिशीला या मूठभर कारखानदार व साखर व्यापाऱ्यांचे खरकटे लागले नसेल, तर त्यांनी अचानक झालेल्या या साखर दरवाढीचा आणि आता झालेल्या अनपेक्षित घसरणीचा तातडीने खुलासा करावा," अशी घणाघाती मागणी शेट्टी यांनी केली.

"अमित शाह यांना टार्गेट करताच दर कोसळले"

साखरेच्या दरातील या अनाकलनीय फेरबदलावर बोट ठेवताना राजू शेट्टी पुढे म्हणाले की, "केंद्रातील शक्तिशाली नेत्यांना आणि विशेषतः गृहमंत्री अमित शाह यांना या मुद्द्यावरून टार्गेट करताच साखरेचे दर अचानक खाली कोसळले आहेत. या संपूर्ण प्रकारात नक्कीच काहीतरी मोठे 'गौडबंगाल' आणि मोठा आर्थिक गैरव्यवहार शिजतो आहे."

अचानक झालेल्या या दरातील घसरणीमुळे सामान्य ग्राहक आणि शेतकरी यांच्यातही संभ्रमाचे वातावरण तयार झाले असून, आता केंद्र सरकार या गंभीर आरोपांवर काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.