मनोहर शिंदे, (नाशिक) २६ ऑगस्ट - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीवरून नाशिकमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील वाद विकोपाला गेला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गेलेले ८ बळी आणि नगरसेवकांचा झालेला अक्षम्य अपमान, या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीची मागणी आता जोर धरू लागली आहे. उद्या (गुरुवारी) नाशिकमध्ये 'कुंभ भक्ती संगम' महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येत असून, या दौऱ्यादरम्यान या वादाचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
१. नगरसेवकांना ताटकळत ठेवले; बैठक ठरली चर्चेचा विषय
कुंभमेळ्याच्या विकासकामांची माहिती देण्यासाठी पंचवटीतील कै. सदाशिव भोरे नाट्यगृहात सर्व १२२ नगरसेवकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
प्रशासकीय निष्काळजीपणा: संध्याकाळी ५ वाजता ६० ते ७० सर्वपक्षीय नगरसेवक वेळेवर उपस्थित राहिले. मात्र, सभागृहात साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, ना स्क्रीन/पडदा लावलेला होता.
अधिकारी गायब: कुंभ आयुक्त किंवा मनपा आयुक्त अर्धा ते पाऊण तास फिरकलेच नाहीत. फोन करूनही कुंभ आयुक्त शेखर सिंह यांनी प्रतिसाद दिला नाही.
नगरसेवकांचा सभात्याग: अपमानास्पद वागणुकीमुळे संतापलेल्या ६० हून अधिक नगरसेवकांनी निघून जाणे पसंत केले. अखेर केवळ १५ ते २० नगरसेवकांच्या उपस्थितीत सादरीकरण उरकण्यात आले.
२. खड्ड्यांमुळे ८ बळी; नागरिकांमध्ये प्रचंड संताप
कुंभमेळ्याच्या नावाखाली संपूर्ण शहरात सुरू असलेल्या नियोजनशून्य खोदकामामुळे नाशिक खड्डेमय झाले आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत ८ निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी यापूर्वीच संताप व्यक्त केला होता.
यापूर्वी खुद्द मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत कामांच्या संथगतीबद्दल प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली होती.
३. राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया
"नगरसेवकांना पाच वाजता बोलावून अधिकारी गायब होते. कुंभ आयुक्त शेखर सिंह फोन किंवा मेसेजला उत्तर देत नाहीत. ही कार्यपद्धती अत्यंत चुकीची आहे."
— सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप
'स्वाभिमान असेल तर हाकलपट्टीचा ठराव करा'
नगरसेवकांची सातत्याने होत असलेली गळचेपी आणि शून्य किंमत यावर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. "नगरसेवकांमध्ये थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल, तर त्यांनी या दोन्ही आयुक्तांच्या हाकलपट्टीचा ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवावा," अशी आक्रमक भूमिका लोकप्रतिनिधी व नागरिकांमधून घेतली जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याच्या तोंडावर उफाळलेल्या या असंतोषामुळे कुंभमेळा प्राधिकरणाच्या आणि मनपाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नगरसेवकांना अधिकृत पत्र देऊन सायंकाळी ५.३० वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, कुंभमेळा आयुक्त तब्बल १ तास १५ मिनिटांनी, म्हणजे ६.४५ वाजता बैठकीला आले. नाशिककरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे प्रतीक्षा करायला लावणे हा केवळ प्रशासकीय विलंब नसून नगरसेवकांचा आणि पर्यायाने नाशिककरांचा अवमान आहे. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून याबाबतआम्ही उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहोत.
- प्रविण (बंटी) तिदमे, महानगरप्रमुख, शिवसेना, नगरसेवक, नाशिक महापालिका