१७९ वर्षांची परंपरा अन् विठ्ठलनामाचा गजर... सरला बेटावर रंगला टाळ-मृदंगाचा सोहळा... मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 25-Aug-2026

शिर्डी, (प्रतिनिधी) २५ ऑगस्ट -  तीर्थक्षेत्र सरला बेटाचा सर्वांगीण विकास साधून सर्व विकासकामे पूर्ण झाल्यानंतर हे बेट महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक प्रमुख 'आध्यात्मिक ऊर्जा केंद्र' बनेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सरला बेट विकास आराखड्याच्या माध्यमातून येथे सभागृह, रस्ते, पूरसंरक्षण भिंत आणि सौरऊर्जेसह विविध कामांना सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेल्या १७९ वर्षांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि महंत रामगिरी महाराज उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

संस्कृती आणि हरिनामाची ताकद: भारताची संस्कृती जगातील सर्वात जुनी आहे. अनेक आक्रमणे होऊनही वारकरी व गुरुपरंपरेमुळे आपले संस्कार आणि श्रद्धा अखंड राहिल्या. हरिनामामुळे मनातील भेद मिटून विठ्ठलभावाची निर्मिती होते.

शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय:

साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून, एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सध्या ७५% शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज मिळत असून, लवकरच १००% शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज दिली जाईल.

शेतकऱ्यांचे ५८ हजार कोटी रुपयांचे थकीत वीजबिल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

'हरिनाम सप्ताह म्हणजे सामाजिक ऐक्याचा सोहळा' – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisement

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखंड हरिनाम सप्ताहाला भक्ती आणि संस्कारांचा अलौकिक सोहळा म्हटले.

सामाजिक ऐक्य: "गावची एकी तर देवाची कृपा नक्की" या उक्तीनुसार हा सप्ताह संपूर्ण परिसरात मांगल्याचे वातावरण आणि ऐक्य निर्माण करतो.

योजनांचा पुनरुच्चार: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' पुढेही सुरू राहील. तसेच शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असून कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन:

पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले की, हा सप्ताह केवळ धार्मिक नसून व्यसनमुक्त आणि बलशाली समाज घडवणारा आध्यात्मिक सोहळा आहे. महंत रामगिरी महाराज ही परंपरा समर्थपणे पुढे नेत असून, या ऐतिहासिक परंपरेच्या संवर्धनासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल.

विशेष क्षण:

'वंदे मातरम्' गीताच्या समूह गायनाबद्दल महंत रामगिरी महाराज यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी "सोनियाचा दिन आज उगवला" या अभंगाच्या तालावर मान्यवरांनी फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.