अक्षय काळे, (मुंबई) २५ ऑगस्ट - राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’चा दुसरा टप्पा पार पडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना तब्बल ५ हजार ८६ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ थेट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात हा निधी हस्तांतरित करण्यात आला.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण १२ लाख ५८ हजार २४३ शेतकऱ्यांना १० हजार ११५ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली असून, पात्र लाभार्थींच्या खात्यात निधी जमा करण्याची ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन व सद्यस्थिती:
"पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १३.७० लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दुसऱ्या टप्प्यातील विभागनिहाय लाभ:
अमरावती विभाग : १ लाख ४५ हजार ८०८ शेतकऱ्यांना ₹१,२०८ कोटींचा लाभ.
नाशिक विभाग : ८४ हजार ८१३ शेतकऱ्यांना ₹७५६ कोटींचा लाभ.
छत्रपती संभाजीनगर विभाग : ३ लाख २ हजार २७३ शेतकऱ्यांना ₹२,२८४ कोटींचा लाभ.
पुणे विभाग : ४९ हजार २२४ शेतकऱ्यांना ₹४१७ कोटींचा लाभ.
नागपूर विभाग : ४४ हजार ८६४ शेतकऱ्यांना ₹३६६ कोटींचा लाभ.
कोकण विभाग : ९ हजार ५४ शेतकऱ्यांना ₹५४ कोटींचा लाभ.
प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासह मंत्रिमंडळातील मान्यवर सदस्य उपस्थित होते.