हप्ता देण्यास नकार...  पान टपरी पेटवली...  दोन भावांवर हल्ला...

Share:
Main Image
Last updated: 24-Aug-2026

 

 

नाशिक, प्रतिनिधी (२४ ऑगस्ट २०२६) -

दरमहा तीन हजार रुपयांचा हप्ता देण्यास स्पष्ट नकार दिल्याने दोन खंडणीखोरांनी मिळून दुकानदारांना बेदम मारहाण करत त्यांची पान टपरी रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईनाक्यातील संदीप हॉटेल परिसरातील खाऊ गल्लीत घडली आहे. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून टपरीचे मोठे नुकसान झाले आहे.

संशयित आरोपी:
रिक्या भामरे आणि ओम लोंढे (दोघे रा. सहवासनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित हप्ताखोरांची नावे आहेत.

Advertisement

फिर्यादी:
माजिद सुफियान खान (रा. मानवता हॉस्पिटलमागे, मुंबईनाका) याने मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

घटनेची पार्श्वभूमी:
शनिवारी (दि. २२) रात्री माजिद खान आणि त्याचा भाऊ बिलाल खान हे संदीप हॉटेलजवळील आपल्या 'माजित पान स्टॉल'वर असताना संशयितांनी तिथे येऊन महिना ३,००० रुपयांच्या हप्त्याची मागणी केली.

मारहाण व जाळपोळ:
"आम्ही येथील भाई आहोत, टपरी चालवायची असेल तर पैसे द्यावे लागतील," अशी धमकी देत त्यांनी हप्ता मागितला. खान बंधूंनी नकार देताच संशयितांनी एकाला लाथाबुक्क्यांनी तर दुसऱ्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर टपरीच्या शटरवर रॉकेल ओतून ती पेटवून दिली.

सुदैवाने अनर्थ टळला:
स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या मारहाणीत बिलाल खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी संशयितांविरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.