केशव खेडकर, (नाशिक) २३ ऑगस्ट - त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे पाडकाम तूर्तास स्थगित. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन जागेचा शोध सुरू असून नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती.
त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाची इमारत पाडण्यास तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत आरोग्य विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, त्र्यंबकेश्वरमधील पाच जागांची पाहणी करण्यात येत आहे. यातील कोणतीही जागा निश्चित करताना नागरिकांना विश्वासात घेतले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोग्यमंत्री आबिटकर नाशिक दौऱ्यावर असून, शनिवारी त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या पाडकामाबाबत भूमिका स्पष्ट केली. कोणाला त्रास व्हावा यासाठी सरकार काम करत नाही. रुग्णालयाच्या स्थलांतराबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. तूर्तास पाडकामाला स्थगिती दिली असून, त्या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू राहील, असे आबिटकर यांनी सांगितले.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कुंभमेळामंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळ्याचे नियोजन सुरू आहे. यापूर्वी मंत्रालयातही आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली होती. कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने त्यानुसार आरोग्य व्यवस्थेचे नियोजन सुरू आहे.
आरोग्य मंत्र्यांचा विविध आरोग्य समिती सदस्यांशी आरोग्य संवाद
गावागावातील प्रत्येक नागरिकाला वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य समित्यांनी अधिक सक्रियपणे कार्य करावे. गावातील आजारी, गंभीर आजाराने त्रस्त तसेच नियमित उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांची माहिती घेऊन त्यांना तपासणी, उपचार आणि आवश्यकतेनुसार संदर्भ सेवेशी जोडावे. तसेच पात्र नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथील मध्यवर्ती सभागृहातून नाशिक जिल्ह्यातील विविध स्तरांवरील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘आरोग्य संवाद’ साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना समिती सदस्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, समस्या, सूचना व विविध मागण्या यांचीही माहिती मंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर यांनी जाणून घेतली.
या आरोग्य संवादामध्ये ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती, एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती तसेच इतर संबंधित आरोग्य समित्यांचे सदस्य सहभागी झाले होते. समिती सदस्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांशी संबंधित विविध प्रश्न मांडले. आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, औषधांचा पुरवठा, तपासणी सुविधा, वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा, रुग्णांना वेळेत उपचार, आरोग्य संस्थांची कार्यक्षमता आणि स्थानिक पातळीवरील विविध अडचणी याबाबत सूचना व मागण्या करण्यात आल्या.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी समिती सदस्यांनी मांडलेल्या सर्व सूचना व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित बाबींवर आवश्यक ती सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख, गुणवत्तापूर्ण आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, स्थानिक पातळीवरील आरोग्य समित्यांचा सक्रिय सहभाग या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्ण शोधण्यापासून उपचाराच्या पाठपुराव्यापर्यंत समित्यांची जबाबदारी
गावात कोण आजारी आहे, कोणाला गंभीर आजार आहे, कोणाला नियमित औषधोपचाराची गरज आहे, कोणाची आवश्यक तपासणी झालेली नाही आणि कोणता रुग्ण उपचारांपासून वंचित आहे, याची माहिती आरोग्य समित्यांनी घेणे आवश्यक आहे. संशयित किंवा गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार योग्य आरोग्य संस्थेकडे संदर्भित करावे.
रुग्ण रुग्णालयात पोहोचला म्हणजे समितीची जबाबदारी संपत नाही. त्याला पुढील तपासणी व उपचार मिळत आहेत की नाही, त्याचा उपचार पूर्ण होत आहे की नाही, याचाही समित्यांनी नियमित पाठपुरावा करावा, असे निर्देश मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवा
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य योजना आहेत. पात्र रुग्णांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आणि समिती सदस्यांनी अधिक सक्रियपणे काम करावे. उपचारासाठी आर्थिक अडचणी येणाऱ्या पात्र नागरिकांना योजनांच्या माध्यमातून आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, याचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच इतर आरोग्य संस्थांमधील मनुष्यबळ, औषधसाठा, उपकरणे, उपलब्ध सुविधा, रुग्णसंख्या आणि उपचारांचा लाभ याबाबत समित्यांनी नियमितपणे माहिती घ्यावी, असेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
स्थानिक पातळीवर आरोग्य संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि उपलब्ध शासकीय आरोग्य सेवांचा प्रभावी लाभ नागरिकांना मिळवून देणे, ही समित्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळा
आरोग्य समित्यांच्या सदस्यांना त्यांच्या अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. समित्यांनी केवळ बैठकीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष गावपातळीवर आरोग्य सेवांच्या उपलब्धतेचा आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांचा आढावा घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
नऊ आरोग्य संस्थांशी थेट संवाद
आरोग्य व्यवस्थेच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेण्यासाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांशी थेट संवाद साधला. यामध्ये नामपूर ग्रामीण रुग्णालय, दिंडोरी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र नवीबेज, ग्रामीण रुग्णालय देवळा, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तपोवन, सिन्नर ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदूर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड, ता. चांदवड यांचा समावेश होता.
या संस्थांमधील आरोग्य सेवा, उपलब्ध मनुष्यबळ, औषधसाठा, उपकरणे, पायाभूत सुविधा, रुग्णसेवा तसेच स्थानिक पातळीवरील अडचणी याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
‘लोकसहभागातून सक्षम आरोग्य व्यवस्था’ निर्माण करण्यावर भर
आरोग्य व्यवस्थेतील विविध समित्या या शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यामुळे ‘लोकसहभागातून सक्षम आरोग्य व्यवस्था’ निर्माण करण्यासाठी समिती सदस्यांनी अधिक जबाबदारीने आणि सक्रियपणे कार्य करणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
गावातील रुग्ण शोधणे, त्यांना योग्य तपासणी व उपचारांशी जोडणे, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देणे, उपचारांचा पाठपुरावा करणे आणि आरोग्य संस्थांच्या सेवांमध्ये आवश्यक सुधारणा घडवून आणणे या संपूर्ण प्रक्रियेत समित्यांनी सक्रिय भूमिका बजावल्यास राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या आरोग्य संवादामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांशी संबंधित स्थानिक प्रश्न थेट शासनाच्या निदर्शनास आणण्यास तसेच त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यास मदत होणार आहे. परिणामी, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सुविधांच्या विकासाला अधिक गती मिळून नागरिकांना अधिक प्रभावी, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.
या कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख श्री. भाऊलाल तांबडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत, सहाय्यक संचालक डॉ. रामजी आडकेकर, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र डॉ. दावल साळवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विविध आरोग्य समित्यांचे सदस्य उपस्थित होते.