मनोहर शिंदे, (नाशिक) २२ ऑगस्ट - महासिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कुंभमेळ्याच्या प्रमुख रस्त्यांपासून तसेच रेल्वेमार्गांपासून ५०० मीटर ते १ किलोमीटर अंतरावरील गावांची निवड करून, तेथील स्थानिक नागरिकांना आपत्कालीन प्रतिसादाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने या अभिनव उपक्रमाचे नियोजन केले आहे.
स्थानिक मदतीचे महत्त्व
कुंभमेळ्याच्या काळात करोडो भाविक शहरात दाखल होणार असल्याने आपत्ती व्यवस्थापनाची व्याप्ती केवळ स्नानक्षेत्रापुरती मर्यादित न ठेवता मार्गावरील गावांपर्यंत वाढवण्यात येत आहे. प्रवासादरम्यान रस्ते किंवा रेल्वे अपघातासारखी दुर्दैवी घटना घडल्यास, व्यावसायिक बचाव पथक पोहोचेपर्यंतचे पहिले काही मिनिटे (गोल्डन अव्हर्स) अत्यंत महत्त्वाचे असतात. अशा वेळी स्थानिक ग्रामस्थ तातडीने प्राथमिक मदत देऊ शकतील.
प्रशिक्षण आणि सहभाग
प्रशिक्षणाचे स्वरूप: ग्रामस्थांना प्राथमिक जीवितरक्षण, प्रथमोपचार (First Aid), शोध व बचावकार्य (Search & Rescue) आणि अग्निसुरक्षेचे मूलभूत धडे दिले जातील.
संस्थांचा सहभाग: या मोहिमेत आपदा मित्र, एनसीसी (NCC), एनएसएस (NSS) आणि रेड क्रॉसच्या स्वयंसेवकांनाही जोडून घेण्यात येणार आहे.
५० विशेष पथके: कुंभमेळा प्राधिकरणाने १,००० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे ५० ‘एकात्मिक प्रतिसाद पथक’ (Integrated Response Teams) तयार करण्याचे प्रस्तावित केले आहे.
प्राधिकरण आयुक्तांचे मत
"भाविकांची हालचाल केवळ साधुग्राम किंवा मुख्य स्नान घाटापुरती मर्यादित नसून संपूर्ण मार्गावर असणार आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कुंभक्षेत्राच्या बाहेरूनच सुरू होणे गरजेचे आहे. स्थानिक ग्रामस्थांना प्रशिक्षित केल्यामुळे भाविकांसोबतच स्थानिकांच्या सुरक्षेचे अतिरिक्त कवच तयार होईल," अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
या व्यापक नियोजनामुळे शेजारील जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन योजना अद्ययावत केल्या जात असून, वाहतूक कोंडी किंवा आपत्कालीन स्थलांतरासाठी मोकळ्या जागांची चाचपणी सुरू आहे. व्यावसायिक यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांच्या समन्वयातून महासिंहस्थासाठी एक सक्षम सुरक्षा कवच तयार होत आहे.