दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २२ ऑगस्ट - जागतिक बँक सहायित ‘महास्ट्राइड’ (MahaSTRIDE) प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीत नाशिक जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. खासगी भांडवलातून तब्बल २ हजार ७३८ कोटी रुपयांची गुंतवणूक उभारल्याबद्दल राज्य शासनाकडून नाशिक जिल्ह्याला ८ कोटी रुपयांचा कामगिरी-आधारित प्रोत्साहन निधी मंजूर झाला आहे. या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
चार निकषांवर मूल्यमापन
जिल्हास्तरीय विकासाला गती देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात २०२५-२६ या वर्षासाठी चार प्रमुख कामगिरी निकषांवर (Performance Criteria) स्वतंत्र संस्थेमार्फत जिल्ह्यांचे मूल्यांकन करण्यात आले.
किमान ६० टक्के किंवा त्याहून अधिक एकत्रित गुण मिळवणारे राज्यातील १३ जिल्हे या निधीसाठी पात्र ठरले आहेत, ज्यामध्ये नाशिकचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्याने धोरणात्मक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत ६२ टक्के एकत्रित गुण प्राप्त केले.
या गुणांकनानुसार नाशिकने राज्यात १२ वा, तर नाशिक विभागात ३ रा क्रमांक पटकावला आहे.
२,७३८ कोटींची खासगी गुंतवणूक
‘महास्ट्राइड’ अभियानांतर्गत वार्षिक कृती आराखड्याची अंमलबजावणी करताना नाशिक जिल्ह्याने तब्बल २,७३८ कोटी रुपयांचे खासगी भांडवल आकर्षित केले आहे. नाशिकला राज्य पातळीवर एक मुख्य 'गुंतवणूक केंद्र' (Investment Hub) म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने ही कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
GDDP वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभिनंदन पत्रात अपेक्षा व्यक्त केली की, नाशिकने हीच गती कायम ठेवून आगामी काळात खासगी भांडवल उभारणीसह 'सकल जिल्हा देशांतर्गत उत्पादन' (GDDP) वाढवण्यासाठी अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे गाठावीत. ‘विकसित महाराष्ट्र’ या ध्येयाच्या दिशेने नाशिकचे हे पाऊल राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रोत्साहन निधीचा वापर कसा करावा, याची सविस्तर कार्यपद्धती ‘मित्रा’ (MITRA) संस्थेमार्फत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे तसेच ‘मुख्यमंत्री फेलोशिप’चे अक्षय भोईटे, अथर्व खोत आणि प्रशांत पाटील यांनी या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले.