नाशिक, (प्रतिनिधी) २१ ऑगस्ट - शहरातील वेगवेगळ्या भागांत सासरच्या मंडळींकडून विवाहितांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या तीन स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीवरून तसेच किरकोळ वादातून या विवाहितांचा छळ करण्यात आला असून, याप्रकरणी सरकारवाडा, सातपूर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पहिली घटना (सरकारवाडा पोलीस ठाणे) :
कॅनडा कॉर्नर भागात राहणाऱ्या विवाहितेचा २०२१ पासून छळ सुरू होता. छत्रपती संभाजीनगर व कॅनडा कॉर्नर येथे वास्तव्यास असताना माहेरहून ७० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी पतीने व सासरच्या पाच जणांनी तिला त्रास दिला. पैसे न आणल्यास पीडितेसह तिच्या तीन वर्षांच्या चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, हवालदार सूर्यवंशी तपास करत आहेत.
दुसरी घटना (सातपूर पोलीस ठाणे) :
औद्योगिक वसाहतीतील अशोकनगर भागात राहणाऱ्या विवाहितेचा माहेरहून हॉटेल व्यवसायासाठी एक लाख रुपये आणण्याच्या कारणावरून २००९ पासून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार खरोटे करत आहेत.
तिसरी घटना (देवळाली कॅम्प पोलीस ठाणे) :
संसरी गावात राहणाऱ्या विवाहितेचा २०२३ पासून सासरच्या मंडळींकडून छळ सुरू होता. किरकोळ कारणांवरून तिला सतत मारहाण केली जात होती. घटस्फोटानंतरही 'तुझे कुठेही दुसरे लग्न होऊ देणार नाही,' अशी धमकी सासरच्यांनी दिल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, जमादार गिऱ्हे पुढील तपास करत आहेत.