केशव खेडकर, (नाशिक) २० ऑगस्ट - प्रेमात झालेली फसवणूक, लग्नाचे दिलेले आमिष आणि त्यानंतर तथाकथित अघोरी बाबाकडून झालेली आर्थिक व मानसिक पिळवणूक... अशा संकटांच्या मालिकेने खचलेल्या एका पीडित महिलेने हातात विषाची बाटली घेऊन न्यायासाठी नाशिक गाठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला.
नेमके काय घडले?
गुजरातच्या बलसाड येथील रहिवासी असलेल्या कमलाबेन (नाव बदललेले, वय ३०) या अत्यंत गरीब कुटुंबातील असून मोलमजुरी करून पोट भरतात. चार वर्षांपूर्वी त्यांची ओळख नाशिकच्या फुलेनगर येथील एका मजुराशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ते बलसाडला 'लिव्ह-इन रिलेशन'मध्ये राहू लागले. "आज लग्न करतो, उद्या करतो" असे सांगत प्रियकराने चार वर्षे तिची फसवणूक केली आणि शेवटी लग्नास नकार देऊन तो नाशिकला निघून आला.
स्मशानात अघोरी पूजा आणि ८३ हजारांची फसवणूक:
या काळात प्रियकराने तिची ओळख नाशिकमधील एका भोंदूबाबाशी करून दिली होती. "अघोरी पूजा केली तर तुमचे लग्न होईल," असे सांगत भोंदूबाबाने अमावास्येच्या रात्री स्मशानात पूजाविधी केला. यासाठी पीडित महिलेने आईचे सोन्याचे दागिने विकून व उसनवारी करून तब्बल ८३ हजार रुपये दिले. मात्र, तरीही काहीच फरक न पडल्याने जाब विचारला असता, भोंदूबाबाने तिला मारून टाकण्याची धमकी दिली.
हातात विषाची बाटली आणि अंनिसची मदत:
प्रियकरानेही भोंदूबाबाचीच बाजू घेत पीडितेला मारहाण केली. पोलिसांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आणि सततच्या धमक्यांमुळे निराश झालेल्या महिलेने हातात विषाची बाटली घेऊन पोलीस ठाण्याचा परिसर गाठला होता.
तिथे उपस्थित पत्रकाराने 'महाराष्ट्र अंनिस'शी संपर्क साधला. अंनिसचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तिच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेत तिचे समुपदेशन केले आणि तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.
"न्याय मिळेपर्यंत चप्पल घालणार नाही!"
महिलेला पंचवटी पोलीस ठाण्यात नेले असता, पोलीस ठाण्याच्या बाहेर अनवाणी उभ्या असलेल्या महिलेच्या पायाला लाल मुंग्या चावत होत्या. कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता, "जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही," असा निग्रह तिने व्यक्त केला. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तिचे सांत्वन करत तिला चप्पल घेऊन दिली.
प्राणघातक हल्ला आणि पुन्हा धमक्या:
पीडिता पुन्हा पोलिसांत गेल्याचे समजताच प्रियकर आणि भोंदूबाबाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी रात्री दोघांनी तिच्या नातेवाईकाच्या घरावर सुरा घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या महिलेने पळ काढून मंदिराचा आडोसा घेत रात्र काढली.
अंनिसचे मदतीचे आवाहन:
सध्या अंनिसचे कार्यकर्ते या महिलेच्या सुरक्षिततेसाठी, राहण्यासाठी व जेवणाची सोय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या पीडित महिलेला तात्पुरता आसरा किंवा मदत करण्यासाठी दानशूर नाशिककरांनी ९८२२६३०३७८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने करण्यात आले आहे.