कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषण आणि कचऱ्याचा प्रश्न कसा हाताळणार? प्रशासनाने पंकजा मुंडेंना सांगितला हा मास्टर प्लॅन...

Share:
Main Image
Last updated: 19-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १९ ऑगस्ट -  नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी आतापासूनच ठोस उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे दिले. देश-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या सुविधेसाठी आणि कुंभमेळा पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिक महानगरपालिकेत सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

गोदावरी व नंदिनी नदी स्वच्छ अन् बारमाही प्रवाहित ठेवा

बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, "नदी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जागृती होत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. कुंभमेळ्याच्या काळात गोदावरी, नंदिनीसह सर्व नद्या स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि बारमाही प्रवाहित राहतील याची दक्षता घेतली पाहिजे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी कोणत्याही परिस्थितीत थेट नदीपात्रात सोडले जाऊ नये."

त्यांनी पुढे नमूद केले की:

जलशुद्धीकरण व एसटीपी प्रकल्प: मलनिःसारण आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या (STP) कामांना गती देऊन त्यांची क्षमता वाढवावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

Advertisement

पाण्याचा पुनर्वापर: प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा प्रभावी पुनर्वापर कसा करता येईल, याचे सूक्ष्म नियोजन करावे.

घनकचरा व स्वच्छता: कुंभमेळा काळात कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने घनकचरा व्यवस्थापनाची पूर्वतयारी करावी. तसेच भाविकांसाठी पुरेशा तात्पुरत्या व कायमस्वरूपी स्वच्छतागृहांची व्यवस्था आतापासूनच आखावी.

नागरी सहभाग: पर्यावरण संवर्धनाच्या मोहीमेत स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवावा. या सर्व कामांसाठी पर्यावरण विभागाकडून आवश्यक ते संपूर्ण सहकार्य पुरवले जाईल.

प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण होणार: प्रशासनाची ग्वाही

बैठकीत कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून ती वेळेत पूर्ण केली जातील. तसेच गोदावरी व उपनद्यांच्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी महापालिकेतर्फे सांडपाणी व्यवस्थापनासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

बैठकीस प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीला महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, विभागीय उपायुक्त विठ्ठल सोनवणे, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील आणि त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.