एस के खेडकर, (नाशिक) १९ ऑगस्ट - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपणाऱ्या नाशिक येथील ऐतिहासिक 'अभिनव भारत मंदिर' परिसर विकासाला आता अधिक गती मिळणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (सन २०२६-२७) अंतर्गत पर्यटन विकासाच्या मूलभूत सुविधांसाठी उर्वरित कामांकरिता २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या स्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात आली आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून (PWD) पूर्ण केले जाणार आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा होलोग्राम व्हिडिओ: सावरकरांचे विचार, देशकार्यातील योगदान आणि जीवनपट नागरिकांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोहोचवण्यासाठी एक विशेष होलोग्राम व्हिडिओ तयार केला जाणार आहे.
भाषाशुद्धी आणि 'शब्द वॉल' (Word Wall): मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सावरकरांनी दिलेल्या योगदानाची ओळख म्हणून त्यांनी रूढ केलेल्या शब्दांची एक आकर्षक भित्तिचित्र (वॉल) उभारली जाईल. यात महापौर, संसद, दूरध्वनी, चित्रपट, आदेश, दिनांक यांसारख्या दैनंदिन वापरात आलेल्या ऐतिहासिक शब्दांचा समावेश असेल.
कायमस्वरूपी सार्वजनिक मालमत्ता: मंजूर निधीतून पर्यटन आणि अभ्यागतांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे.
अंमलबजावणी आणि नियमावली:
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, मंजूर निधी केवळ प्रशासकीय मान्यता प्राप्त अंदाजपत्रकावरच खर्च केला जाईल आणि वाढीव निधी अनुज्ञेय राहणार नाही. कामाची तांत्रिक गुणवत्ता राखणे, ई-निविदा प्रक्रियेचा वापर करणे, दर्शनी भागात माहिती फलक लावणे आणि काम वेळेत पूर्ण करून उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे अंमलबजावणी यंत्रणेवर बंधनकारक असणार आहे.
अभिनव भारत मंदिराच्या या कायापालट प्रकल्पामुळे नाशिकच्या पर्यटन आणि सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे.