एस के खेडकर, (नाशिक) १९ ऑगस्ट - हरित महाराष्ट्र अंतर्गत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन, हरित आच्छादन वाढविणे आणि पर्यावरण संरक्षणासाठी जनसहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नियोजनानुसार नाशिक जिल्ह्यात ‘हरित महाराष्ट्र अभियान’ आणि ‘एक पेड़ माँ के नाम’ अंतर्गत व्यापक वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी एकाच दिवशी तब्बल ५.२९ लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी दिली आहे.
या वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी आमदार गोकुळ गिते, महापौर हिमगिरी आडके, विभागीय आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, मुख्य वनसंरक्षक गजेंद्र हिरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांच्या हस्ते ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, हरित आच्छादन वाढविणे, वृक्षसंवर्धन तसेच जनसहभागातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
विविध विभागांच्या समन्वयातून ५.२९ लाख रोपांची लागवड
जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा, जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कृषी विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग तसेच अशासकीय व सेवाभावी संस्था, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. या वृक्षलागवडीमध्ये वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने १.७९ लाख, वनविकास महामंडळाने २९ हजार, रेशीम विभागाने १८ हजार, कृषी विभागाने ७१ हजार, ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदेने १.२६ लाख, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषदांनी ९० हजार, तर अशासकीय संस्था, सेवाभावी संस्था, विद्यार्थी व लोकसहभागातून १६ हजार रोपांची लागवड केली. अशा प्रकारे एकूण ५.२९ लाख रोपांची लागवड करण्यात आली.
ऑनलाइन नोंदणीलाही मोठा प्रतिसाद
वृक्षलागवडीची माहिती विविध ऑनलाइन प्रणालींवर नोंदविण्यात आली आहे. ‘एक पेड़ माँ के नाम’ पोर्टलवर १.७८ लाख, ‘अमृतवृक्ष’ ॲपवर जवळपास ५.४८ लाख, तर Forest Portal Login वर जवळपास ६.५ लाख वृक्षलागवडीची माहिती ऑनलाइन करण्यात आली आहे.
हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत सुमारे १६.५० लाख वृक्षलागवडीचे पाऊल
नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात आलेल्या या व्यापक वृक्षलागवड मोहिमेमुळे वनमहोत्सव कालावधीत जिल्ह्याने जवळपास १६.५० लाख वृक्षलागवडीचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जनसहभागातून पर्यावरण संवर्धन, हरित आच्छादन वाढविणे आणि शाश्वत पर्यावरण निर्मितीच्या दिशेने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
‘एक पेड़ माँ के नाम’— आईच्या सन्मानार्थ एक झाड, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक संकल्प! या संदेशातून वृक्षलागवडीसोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारावी, असा पर्यावरणपूरक संदेश या मोहिमेतून देण्यात आल्याचे उपवनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) गणेश रणदिवे यांनी म्हटले आहेत.