दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १९ ऑगस्ट - त्र्यंबकेश्वर शहरातील जिल्हा उपरुग्णालय जमीनदोस्त करून ते शहरापासून दूर नेण्याच्या निर्णयावर 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने' (अंनिस) तीव्र आक्षेप घेतला आहे. कुंभमेळ्याच्या नावाने रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर करणे म्हणजे स्थानिक आणि आदिवासी रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असून, यामुळे परिसरात बुवाबाजी व अघोरी उपचारांना खतपाणी मिळेल, असा इशारा देत 'अंनिस'तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मुद्दे व मागण्या:
आरोग्यसेवेची दुरवस्था व स्थलांतर:
सध्याचे उपरुग्णालय पाडून पर्यायी आरोग्यसेवा त्र्यंबकेश्वर गावापासून सुमारे ३ किमी आणि मुख्य रस्त्यापासून २ किमी आत सुरू करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उच्चपदस्थांनी ही 'तात्पुरती सोय' केल्याची मखलाशी केली असली, तरी यामुळे स्थानिक आणि आदिवासी भागातील रुग्णांची मोठी हालबहाल होत आहे.
अंधश्रद्धा अन् भोंदूगिरीला खतपाणी:
ग्रामीण व आदिवासी भागांत शासकीय आरोग्य सुविधांचा अभाव हेच भोंदूगिरी वाढण्याचे मुख्य कारण आहे. योग्य वैद्यकीय उपचार वेळेत न मिळाल्यास नागरिक नाईलाजाने भगतगिरी, अंगारे-धुपारे आणि अघोरी उपचारांकडे वळतात, अशी भीती अंनिसने व्यक्त केली आहे.
कायमस्वरूपी इमारतीची मागणी:
त्र्यंबकेश्वर शहराला लागूनच, सर्वांच्या सोयीच्या ठिकाणी सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा उपरुग्णालयाची कायमस्वरूपी इमारत तातडीने बांधण्यात यावी. तसा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे त्वरित पाठवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन विभागीय आयुक्त (महसूल) आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनाही माहिती व पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे. निवेदनावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, प्रा. आशा लांडगे, महेंद्र दातरंगे आणि रंजन लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.