नाशिक, (प्रतिनिधी) १८ ऑगस्ट - रात्रीच्या वेळी रेल्वे लाईन परिसरात फिरणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याचा राग आल्याने, अज्ञात ३ ते ४ जणांनी एका रेल्वे सुरक्षारक्षकाला (वॉचमन) लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना संसरीगाव शिवारातील गोडसे मळा भागात घडली आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
असा घडला प्रकार:
फिर्यादी: गणेश लक्ष्मण जाधव (रा. विजयनगर, भगूर) हे रेल्वेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत.
घटनाक्रम: रविवारी (दि. १६) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जाधव हे गोडसे मळा परिसरातील रेल्वे पुलाजवळ (अपलाईन नं. १८२ - २४-२६) गस्त घालत आपल्या कर्तव्यावर होते.
मारहाण व लूट: या दरम्यान २५ ते ३० वयोगटातील ३ ते ४ युवक रेल्वे लाईनवरून जाताना त्यांना दिसले. जाधव यांनी त्यांना हटकत "रात्रीच्या वेळी रेल्वे पुलावर का फिरता?" असा जाब विचारला. याचा राग आल्याने संशयितांनी जाधव यांना अवाच्य शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर संशयित भामट्यांनी जाधव यांच्या खिशातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलीस सहाय्यक निरीक्षक बैसाणे पुढील तपास करत आहेत.