अक्षय काळे, (मुंबई) १८ ऑगस्ट - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. "विघ्नहर्त्याच्या आगमनात खड्ड्यांचे कोणतेही विघ्न येऊ नये," असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवापूर्वी सर्व प्रमुख आणि विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. तसेच, उत्कृष्ट कामगिरी करून खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या महानगरपालिकेला नगरविकास विभागामार्फत विशेष बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली.
बैठकीतील महत्त्वाचे निर्देश व निर्णय:
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: पावसाळ्यात तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी रस्ते तातडीने व प्रभावीपणे बुजवण्यासाठी 'प्री कास्ट' आणि 'जिओ पॉलिमर टेक्नो पॅच' यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
२४x७ यंत्रणा व ऑन-फिल्ड पाहणी: खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने २४ तास यंत्रणा सज्ज ठेवावी. मनपा आयुक्तांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामांची पाहणी करावी.
अॅप अन् तक्रार निवारण: खड्ड्यांच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर आणि मोबाईल अॅपचा वापर करावा. खड्डे बुजवल्यानंतरचे 'बिफोर-आफ्टर' फोटो सोशल मीडियावर टाकून नागरिकांना माहिती द्यावी.
इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांची दुरुस्ती: PWD, MSRDC, MIDC, PMRDA यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे त्रासदायक ठरत असल्यास, मनपाने स्वतःच्या खर्चाने ते दुरुस्त करून नंतर संबंधित यंत्रणेकडून तो खर्च वसूल करावा.
नवीन उत्खननावर बंदी: गणेशोत्सव संपेपर्यंत कोणत्याही यंत्रणेला नवीन रस्ते खोदण्याची परवानगी दिली जाणार नाही. विसर्जन मार्गावरील लटकणाऱ्या विद्युत तारांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले.
मंडळांना सुलभ परवानगी: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानग्या देण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवावी आणि त्यांच्याकडून कोणतेही अनावश्यक शुल्क आकारू नये.
चांगले काम करणाऱ्या मनपांना पुरस्कार, तर हलगर्जीपणा करणाऱ्यांची नोंद!
खड्डेमुक्त, सुरक्षित आणि दुर्घटनामुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या पहिल्या तीन महानगरपालिकांना विशेष पुरस्कार दिले जातील. मात्र, काम निकृष्ट दर्जाचे असल्यास किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित मनपा व अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल; तसेच अशा पालिकांचा विकासनिधी रोखताना या बाबींची गांभीर्याने नोंद घेतली जाईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.