पंढरपूर, (प्रतिनिधी) १७ ऑगस्ट - महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याचे जाहीर झाले आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आल्याचे कळताच मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दरबारात आनंद व्यक्त केला.
दर्शनादरम्यान पत्नीने दिली बातमी
मंत्री गिरीश महाजन हे आपल्या मतदारसंघातील सुमारे १५ ते १६ हजार भाविकांसह पंढरपूरच्या वारीसाठी आले होते. पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेत असतानाच त्यांच्या पत्नीने नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याची बातमी हळूच त्यांच्या कानात सांगितली. या प्रसंगी बोलताना "आज खरोखर पांडुरंग पावला," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प
नाशिकच्या विकासाला गती देण्यासोबतच आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याचे नियोजन अत्यंत अभूतपूर्व आणि भव्य स्वरूपात करण्याचा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. "यंदाचा महाकुंभ न भूतो न भविष्यती असा होईल आणि नाशिक शहराचा पायाभूत चेहरामोहरा बदलून जाईल," असा शब्द त्यांनी नाशिककरांना दिला.
निवडीनंतर गिरीश महाजन यांनी दिली ही प्रतिक्रिया
कुंभनगरी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रथी फडणवीस यांचे महाजन यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो . नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा आणि गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
नाशिकच्या विकासासाठी पालक म्हणून नव्हे, तर सेवक म्हणून काम करण्याचा निर्धार महाजन यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व घटकांच्या अपेक्षा, समस्या आणि गरजा जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाईल. आपल्यावर सोपविण्यात आलेल्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. शासन, प्रशासन आणि जनतेच्या समन्वयातून नाशिकच्या विकासाची गती वाढविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येणार आहे.
नाशिकची ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि औद्योगिक ओळख अधिक मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था, पर्यटन, रोजगारनिर्मिती आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे.
आगामी कुंभमेळा हा नाशिकच्या विकासासाठी मोठी संधी असून, या माध्यमातून नाशिकची ओळख देशासह जागतिक स्तरावर अधिक ठळक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या विकासकामांचा दीर्घकालीन फायदा नाशिककरांना मिळावा, यासाठी पायाभूत सुविधांचे नियोजन आणि विकासकामांमध्ये दूरदृष्टी ठेवली जाणार आहे.
नाशिकच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला चालना देतानाच युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, शहर आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे तसेच जिल्ह्यातील विविध भागांचा संतुलित विकास साधणे यावरही भर दिला जाणार आहे.
नाशिकच्या विकासाला नवी दिशा आणि नवी गती देण्यासोबतच नाशिककरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच कुंभनगरीचा नावलौकिक देश-विदेशात अधिक उंचावण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे गिरीश महाजन यांनी नमूद केले.