मनोहर शिंदे, (नाशिक) १७ ऑगस्ट - नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणारे प्राणघातक अपघात या गंभीर मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास, वाढते अपघात आणि सात जणांचा झालेला अपघाती मृत्यू याविरोधात ठाकरे गटातर्फे सोमवारी नाशिक महापालिकेवर भव्य 'जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आला. "ज्यांना शहरातील रस्ते खड्डेमुक्त करता येत नाहीत, ते कुंभमेळा घेण्याची तयारी करत आहेत," अशा आक्रमक शब्दांत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.
यमराज आणि रेडा
आज नाशिकमध्ये जीवघेण्या खड्ड्यांविरोधात खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा महापालिकेवर विराट 'जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आला. रस्त्यांची झालेली चाळण आणि निष्पापांचे जाणारे बळी... प्रशासनाला जागे करण्यासाठी मोर्चात थेट 'यमराज आणि रेडा' आणून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: नाशिकमधील खड्ड्यांमुळे आतापर्यंत सात निष्पाप नागरिकांचा जीव गेला असून शंभराहून अधिक जण जखमी झाले आहेत. या मृत्यूंना जबाबदार धरून महापालिका प्रशासनावर आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व महापालिका आयुक्तांची तातडीने बदली करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
‘खड्डे महाकाल’ आणि कुंभमेळा मंत्र्यांवर टीका: कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर उपरोधिक शब्दात निशाणा साधत त्यांना 'खड्डे महाकाल' व 'चंपतराय कुंभमंत्री' असे संबोधण्यात आले. शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्ते स्विमिंग पूलसारखे झाले आहेत, अशी टीका शिवसैनिकांनी केली.
दत्तक नाशिकची दुरवस्था: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते, मग 'दत्तक पित्याने नाशिककरांसाठी काय केले?' असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला.
आमदार-नगरसेवकांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा: शहरात दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले नाही, तर ज्या भागात खड्डे आहेत त्या परिसरातील भाजप आमदारांच्या व माजी नगरसेवकांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
नागरिक व स्कूल व्हॅन चालक हैराण: खड्ड्यांमुळे तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका स्कूल व्हॅन चालकांसह विद्यार्थ्यांना बसत असून दररोज एका तासापूर्वी घरातून निघावे लागत असल्याचे चालकांनी सांगितले.
खासदार राजाभाऊ वाजे आणि स्थानिक शिवसैनिकांनी या जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व केले असून नाशिककरांच्या सुरक्षेसाठी व हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.