एस.के. खेडकर, (नाशिक) १७ ऑगस्ट - नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या महासिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे १२ कोटी भाविक दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अमृतस्नानाच्या दिवशी एकाच वेळी १.५ कोटींहून अधिक भाविकांच्या उपस्थितीमुळे मोबाइल व इंटरनेट सेवांवर पडणारा प्रचंड ताण लक्षात घेऊन प्रशासनाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रस्ते, पाणी आणि विजेप्रमाणेच दूरसंचार व्यवस्थेला अत्यावश्यक सेवा मानून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पाचस्तरीय दूरसंचार कवच उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
"प्रत्येक भाविक संपर्कात, प्रत्येक घटना प्रशासनाच्या निदर्शनास आणि प्रत्येक अधिकारी संपर्कात," हे या यंत्रणेचे मुख्य उद्दिष्ट असून, सर्वात गर्दीच्या दिवशीही ‘कम्युनिकेशन ब्लॅकआउट’ होऊ नये, यासाठी हा डिजिटल मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे.
असे असेल पाचस्तरीय दूरसंचार कवच:
स्तर १ - सार्वजनिक मोबाइल नेटवर्क: अतिरिक्त क्षमता वाढवून कॉल, इंटरनेट व डेटा सेवा गतिमान करणे.
स्तर २ - खासगी नेटवर्क: प्रशासकीय व महत्त्वाच्या कामांसाठी स्वतंत्र संपर्क व्यवस्था.
स्तर ३ - मिशन-क्रिटिकल कम्युनिकेशन (MCX): पोलीस, आरोग्य व आपत्ती व्यवस्थापनासाठी आपत्कालीन स्थितीतही अखंड चालणारे नेटवर्क.
स्तर ४ - मॅनेज्ड वाय-फाय (Managed Wi-Fi): गर्दीच्या ठिकाणी विश्वासार्ह सार्वजनिक वाय-फाय सेवा.
स्तर ५ - फायबर व सॅटेलाइट बॅकअप: नेटवर्क ठप्प झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून IP/Fibre आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी.
कमांड सेंटर आणि 'कुंभदूत' एआय सहाय्यक
हे संपूर्ण नेटवर्क एकात्मिक नियंत्रण व कमांड केंद्राशी (ICCC) जोडले जाणार असून, त्यात सीसीटीव्ही, वाहनांचे जीपीएस, पार्किंग कॅमेरो, ड्रोन, पूर व हवामान सेन्सर्सचा समावेश असेल.
तसेच भाविकांच्या सुविधेसाठी ‘कुंभदूत’ एआय (AI) सहाय्यक उपलब्ध करून दिला जाणार आहे. याद्वारे भाविकांना घाट, पार्किंग, वाहतूक मार्ग, आरोग्य सेवा, हरवले-सापडले केंद्र, हवामान आणि गर्दीची रिअल-टाईम माहिती एकाच क्लिकवर मिळणार आहे.
"महासिंहस्थ २०२७ साठी संपर्क व्यवस्था ही आता केवळ सुविधा नसून अत्यावश्यक पायाभूत सुविधा आहे. सर्वाधिक गर्दीच्या दिवशीही यंत्रणा सक्षम राहावी यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे."
— शेखर सिंह, आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण