विद्यार्थ्यांसाठी मोठं सरप्राइज... रिलायन्स फाउंडेशन देणार ६ लाखांची स्कॉलरशिप...

Share:
Main Image
Last updated: 16-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १६ ऑगस्ट - उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आपल्या अधिकृत शिष्यवृत्ती योजनेची अर्ज प्रक्रिया जाहीर केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील प्रथम वर्षात शिकणाऱ्या एकूण ५,१०० पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले जाणार असून, यामध्ये ५,००० पदवीपूर्व (Undergraduate) आणि १०० पदव्युत्तर (Postgraduate) विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत पदवीपूर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण कालावधीत ₹२ लाखांपर्यंत, तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ₹६ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल. देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेत प्रथम वर्षात पूर्णवेळ शिक्षण घेणारे विद्यार्थी यासाठी मोफत अर्ज करू शकतात.

निवड निकष आणि प्रमुख वैशिष्ट्ये:

पदवीपूर्व शिष्यवृत्ती: विद्यार्थ्यांची निवड गुणवत्ता (Merit) आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती या दोन्ही निकषांच्या आधारे केली जाईल.

Advertisement

पदव्युत्तर शिष्यवृत्ती: अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि लाईफ सायन्सेस यांसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

अतिरिक्त फायदे: आर्थिक मदतीशिवाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नेतृत्व विकास आणि उद्योग क्षेत्रातील नेटवर्किंगच्या संधी मिळतील.

रिलायन्स फाउंडेशन गेल्या तीन दशकांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे काम करत असून आतापर्यंत ३३,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

असा करा अर्ज:

या शिष्यवृत्तीसाठी कुठलेही अर्ज शुल्क नसून, पात्र विद्यार्थी रिलायन्स फाउंडेशनच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

Advertisement

Comments

No comments yet.