आपत्तीप्रवण गावांना मोठा दिलासा... पुनर्वसनाच्या नियमात बदल...

Share:
Main Image
Last updated: 14-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ ऑगस्ट - अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, जमिनीला भेगा पडणे आणि दरडी कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित व आपत्तीप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार लवकरच नवीन सुधारित धोरण जाहीर करणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणात आवश्यक बदल करून अधिक प्रभावी धोरण तयार केले जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन आणि तेथे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्यासह कोकण व पुणे विभागाचे आयुक्त, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. १४ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या विद्यमान धोरणात बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक सुधारणा करण्याचा प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन आहे.

लोकप्रतिनिधींच्या सूचनांना प्राधान्य: आपत्तीग्रस्त गावांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या सूचना सादर कराव्यात, व्यवहार्य सूचनांचा समावेश सुधारित धोरणात करून ते अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवले जाईल.

Advertisement

भैरवगडग्रस्तांचे सासपडे येथे पुनर्वसन: सातारा जिल्ह्यातील मौजे भैरवगड येथील भूस्खलनग्रस्त कुटुंबांचे मौजे सासपडे येथे पुनर्वसन करण्याबाबत म्हाडा व अन्य यंत्रणांच्या समन्वयाने कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

कराड उत्तर मतदारसंघाला १८ नागरी सुविधा: पूरपरिस्थितीमुळे पुनर्वसित झालेल्या गावांना शासन धोरणानुसार अनुज्ञेय असलेल्या सर्व १८ नागरी सुविधा जलद गतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

सध्याच्या धोरणातील तरतुदी: सध्याच्या नियमांनुसार बाधित पात्र कुटुंबांना पुनर्वसनासाठी किमान ५०० चौरस फूट स्वतंत्र भूखंड दिला जातो. तसेच घरकुल निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत देण्याची सुधारणा करण्यात आली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.