मनोहर शिंदे, (नाशिक) १४ ऑगस्ट - नाशिक महानगरपालिकेच्या कारभारावर आणि शहरातील बिकट रस्त्यांवरून प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांचा थेट आवाज दाबण्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात सुरू असलेली विकासकामे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीवरून नागरिक सोशल मीडियावर प्रश्न विचारत असल्याने, महापालिकेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसचे कमेंट सेक्शनच थेट बंद (Disable) केले आहे. महापालिकेच्या या पळपुट्या धोरणामुळे नाशिककरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे नेमका प्रकार?
गेल्या काही दिवसांपासून शहरातील खड्डे, निकृष्ट दर्जाची विकासकामे आणि संथ गतीने सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नाशिककर नागरिक हैराण झाले आहेत.
कमेंट सेक्शन बंद: महापालिकेकडून सोशल मीडियावर विविध विकासकामांच्या पोस्ट अपलोड केल्या जात आहेत. मात्र, त्यावर नागरिकांनी विचारलेले जाब आणि केलेल्या टिकेचा सामना टाळण्यासाठी प्रशासनाने कमेंट सेक्शन पूर्णपणे बंद करून पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न: "महापालिकेला फक्त कामे पाहणारे नागरिक हवे आहेत, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न विचारणारे नकोत," असा संतप्त सवाल आता नाशिककर विचारत आहेत.
सोशल मीडियावर नेटिझन्सचा रोष: कमेंट्स बंद केल्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या या भूमिकेवर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. लोकांचा लोकशाही मार्गाने उपस्थित होणारा आवाज दाबण्यासाठीच प्रशासनाने ही पळवाट शोधल्याचा आरोप केला जात आहे.
प्रशासनाच्या भीतीपोटी निर्णय?
खड्ड्यांचे निकृष्ट बुजवाकाम आणि रस्ते दुरुस्तीतील अपयश लपवण्यासाठीच महापालिका प्रशासनाला लोकांची एवढी भीती वाटत आहे की, त्यांना थेट कमेंट बॉक्स बंद करण्याची नामुष्की आली आहे, अशी चर्चा शहरात रंगली आहे. करदात्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी संवादच खंडित करण्याच्या महापालिकेच्या या कारभारावर आता चौफेर टीका होत असून, कमेंट सेक्शन पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.