अक्षय काळे, (मुंबई) १४ ऑगस्ट - राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींची दुरुस्ती तातडीने पूर्ण करून नागरिकांची दळणवळणाची सोय पूर्ववत करा. तसेच नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित सर्व पायाभूत सुविधांची कामे नियोजित वेळेत आणि सर्वोच्च गुणवत्तेसह पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव आबासाहेब नागरगोजे, सचिव (रस्ते) शरद राजभोज, सर्व मुख्य अभियंता व व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व अधीक्षक अभियंते उपस्थित होते.
कुंभमेळा कामांचा सविस्तर आढावा
नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात देशभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या सुविधेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्रमुख प्रकल्प: घोटी–त्र्यंबकेश्वर मार्ग, नाशिक रिंग रोड, ओझर विमानतळाशी संबंधित कामे, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील शासकीय विश्रामगृहांची बांधकामे आणि त्र्यंबकेश्वर येथील 'डी.पी.' रस्त्यांच्या कामांमधील भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.
गुणवत्तेशी तडजोड नको: कामे घाईघाईने करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामांची प्रत्यक्ष पाहणी करून नियमित तपासणी करावी, असे त्यांनी बजावले.
अतिवृष्टीबाधित भागातील रस्त्यांची दुरुस्ती प्राधान्याने
पावसाळ्यात खड्डे पडलेले रस्ते, वाहून गेलेले पूल आणि इतर संरचनात्मक त्रुटी दूर करण्यासाठी तात्पुरत्या दुरुस्तीसोबतच कायमस्वरूपी उपायांवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. अतिवृष्टीचे बदलणारे स्वरूप आणि पर्जन्यमान लक्षात घेऊन पाण्याचा योग्य निचरा होईल अशा शास्त्रीय पद्धतीने नवीन रस्त्यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय:
जनसुविधा केंद्रे: राज्यातील प्रमुख महामार्गांवर प्रवाशांच्या मूलभूत गरजांसाठी प्रस्तावित जनसुविधा केंद्रांच्या कामांना गती दिली जाईल.
रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड: केवळ रस्ते विकास न करता स्थानिक हवामानाला अनुकूल झाडांची रस्त्यांच्या दुतर्फा लागवड व संवर्धन करण्याची मोहीम राबवली जाईल.
महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास आराखडा (२०२५-२०४७): प्रत्येक जिल्ह्याच्या भविष्यातील वाहतूक, औद्योगिक व पर्यटन गरजांनुसार दीर्घकालीन रस्ते नेटवर्क तयार करण्याच्या कामाचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.