मनोहर शिंदे, (नाशिक) १३ ऑगस्ट - शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. या सर्व प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १७ ऑगस्ट रोजी पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी नाशिक दौरा करत शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि राज्य सरकारसह स्थानिक प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.
"भाजपला कुंभमेळा नाही, तर पैसे कमवायचे आहेत"
पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकार आणि भाजपवर गंभीर आरोप केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांत तब्बल ६०० कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर काढल्याचा आरोप करत त्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला.
"बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले आहे, ते कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. या प्रकरणात हाती लागलेले हे फक्त छोटे मासे असून, त्याहून मोठे सूत्रधार पडद्यामागे आहेत. भाजपला कुंभमेळा यशस्वी करायचा नसून त्यातून फक्त पैसे कमवायचे आहेत," असा घणाघाती आरोप ठाकरे यांनी केला. तसेच उज्जैनमध्ये कुंभमेळ्याची ८० टक्के कामे पूर्ण झाली असताना, नाशिकमध्ये मात्र काँक्रिटीकरण आणि रस्त्यांच्या नियोजनात शून्य प्रगती असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
'दत्तक शहरा'च्या अवस्थेवरून मुख्यमंत्र्यांवर टीका
शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना ठाकरे म्हणाले, "मी जिथे जिथे जातो, तिथे माझ्याआधी रस्ते दुरुस्तीसाठी जेसीबी पाठवला जातो. शहरात अशी अवस्था असेल तर उद्योग कसे टिकणार? रस्ते बुजवण्यासाठी वापरला जाणारा पैसा हा करदात्या नागरिकांचा आहे." उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी नाशिक 'दत्तक' घेण्याची घोषणा केली होती, त्याचा पुनरुच्चार करत "फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या शहराची हीच का ती अवस्था?" असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच महापालिका आयुक्त व महापौरांना इशारा देताना ते म्हणाले की, सत्ता बदलत असते, त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतेही निर्णय किंवा आश्वासने देताना याचे भान ठेवावे. १७ ऑगस्टच्या मोर्चात नागरिक आणि सत्ताधाऱ्यांनीही सहभागी व्हावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
विद्यार्थ्यांच्या त्या व्हिडिओची दखल: आदित्य ठाकरे पोहोचले थेट पेगलवाडीत
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांची व्यथा मांडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पाण्याच्या बाटलीचा माईक करून मुलांनी केलेल्या उपरोधिक रिपोर्टिंगची दखल घेत आदित्य ठाकरे यांनी थेट पेगलवाडी गावाला भेट दिली.
ठाकरे यांनी व्हिडिओ बनवणाऱ्या विद्यार्थ्यांशी व इतर शाळकरी मुलांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक गरजा, व्हिजन आणि अडचणी जाणून घेतल्या. या वेळी ते म्हणाले, "Gen Alpha पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडत आहे. रायगडच्या कोंदिवडे गावातील मुलींनी छत्रीचा माईक करून असाच प्रश्न मांडला होता. या मुलांच्या जागरूकतेमुळेच काल रात्री घाईघाईने प्रशासनाला खड्डे बुजवावे लागले."
शाळेत वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था असल्याचे सांगत, "शिक्षणमंत्र्यांचे शिक्षणाकडे लक्ष नाही, केवळ राजकीय दौऱ्यांच्या भीतीपोटी प्रशासन पळापळ करते," अशी टीका त्यांनी केली.
ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
दरम्यान, विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल होताच आणि आदित्य ठाकरे पेगलवाडीत येणार असल्याचे समजताच जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि आमदार हिरामण खोसकर यांनी पेगलवाडी रस्त्याची तत्काळ पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच पेगलवाडी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते.