एस.के. खेडकर, (नाशिक) १२ ऑगस्ट - कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार आणि थेट पणन केंद्रांवर विक्रीसाठी येणाऱ्या शेतमाल, फळे व भाजीपाल्याला कृत्रिमरीत्या पिकवणे, गोडी वाढवणे किंवा आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर केल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिला आहे. दोषी आढळल्यास अन्न सुरक्षा कायद्यानुसार थेट परवाना रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
पणन संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व बाजार समित्या व परवानाधारकांना देण्यात आले आहेत.
महत्त्वाचे नियम व निर्देश:
कडक नजर: फळे व भाजीपाला आकर्षक दिसण्यासाठी किंवा दीर्घकाळ टिकवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करण्यावर पूर्ण बंदी.
अन्न व औषध प्रशासनाशी समन्वय: भेसळ किंवा घातक रसायनांचा संशय आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाला (FDA) पाचारण करून शेतमालाची तपासणी केली जाईल.
कडक कारवाई: 'अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६' अन्वये दोषींवर गुन्हे दाखल होणार असून बाजार समितीतील सोयी-सुविधा काढून घेऊन परवाना कायमचा रद्द केला जाईल.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.