नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ११ ऑगस्ट - नाशिक जिल्ह्यात मूल्य स्थिरीकरण कोष (PSF) अंतर्गत झालेल्या कांदा खरेदीतील कथित गैरव्यवहार, निकृष्ट साठवणूक आणि खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या प्रश्नावरून नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे आक्रमक झाले आहेत. दोन्ही खासदारांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांची संयुक्त भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी केली.
नेमकी खरेदी किती झाली, कांदा कोणाकडून घेतला गेला आणि प्रत्यक्षात किती साठा शिल्लक आहे, याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
६० ते ७० टक्के कांदा सडला: चांदवड तालुक्यात ३ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या पंचनाम्यानुसार, खरेदी केंद्रावरील सुमारे २,२०० ते २,४०० मेट्रिक टन कांद्यापैकी ६० ते ७० टक्के कांदा सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तसेच पाहणीदरम्यान केंद्रावर कोणताही जबाबदार प्रतिनिधी उपस्थित नव्हता.
खरेदी प्रक्रियेच्या ऑडिटची मागणी: कांदा कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केला, त्याची गुणवत्ता आणि दर काय होते, प्रत्यक्ष साठ्यात तफावत आहे का, आणि शेतकऱ्यांना त्यांची देयके (Payments) वेळेवर मिळाली आहेत का, याची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.
माहिती सार्वजनिक करण्याचे आवाहन: जिल्ह्यात कांदा खरेदी करणाऱ्या FPO/FPC, सहकारी संस्था, CWC गोदामातील साठा आणि NAFED तसेच NCCF कडून झालेल्या कारवाईचा संपूर्ण तपशील केंद्र सरकारने जाहीर करावा, अशी मागणी खासदारांनी केली.
खासदारांची प्रतिक्रिया:
"PSF योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा अशा प्रकारे खराब होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या मालाची आणि शासनाच्या निधीची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे."
— खासदार राजाभाऊ वाजे (नाशिक)
"मी स्वतः चांदवड येथील साठवणूक केंद्राला भेट देऊन जागेवरची भयानक वस्तुस्थिती पाहिली आहे. हा केवळ कागदोपत्री विषय नसून शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न आहे. खरेदी अभिलेख आणि प्रत्यक्षातील साठा यांची कसून तपासणी करून सत्य समोर आणले पाहिजे."
— खासदार भास्कर भगरे (दिंडोरी)