आश्रमशाळेत सर्पदंशामुळे ३ विद्यार्थिनींचा मृत्यू... नाशिक व नागपूरच्या पथकांकडून...

Share:
Main Image
Last updated: 11-Aug-2026

गडचिरोली, (प्रतिनिधी) ११ ऑगस्ट - जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आहे. या गंभीर घटनेची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून, जबाबदारी निश्चित करण्यासाठी नाशिकचे आदिवासी विकास आयुक्तालय आणि नागपूर येथील विशेष पथके घटनास्थळी दाखल होऊन सखोल तपास करत आहेत.

या घटनेतील अन्य तीन विद्यार्थिनींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना तातडीने 'सर्पदंश प्रतिबंधक लस' (अँटी व्हेनम) देण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे.

कठोर कारवाईचा इशारा: आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही. चौकशीत निष्काळजीपणा आढळून आल्यास संस्था व संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिला.

?s=20

Advertisement

उपचाराधीन विद्यार्थिनींवर विशेष लक्ष: जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना उपचाराधीन तिन्ही विद्यार्थिनींच्या वैद्यकीय उपचारात कोणतीही कमतरता भासू नये, अशा कडक सूचना दिल्या आहेत.

सुरक्षा व्यवस्थेची चौकशी: ही आश्रमशाळा अनुदानित असल्याने निवासी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा पुरवणे संस्थेचे कर्तव्य होते. या घटनेत सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते की नाही, याची चौकशी केली जात आहे.

पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांकडून शोक व्यक्त: जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि बाधित विद्यार्थिनींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

आदिवासी विकास विभागाच्या चौकशी पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.