एस.के. खेडकर, (नाशिक) १० ऑगस्ट - शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या गंभीर समस्येवरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता आक्रमक झाली आहे. या परिस्थितीचा फायदा उठवत ठाकरेंच्या शिवसेनेने नाशिकमध्ये एका मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याची माहिती महापालिकेतील गटनेते केशव पोरजे आणि योगेश भोर यांनी दिली.
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी केशव पोरजे, योगेश भोर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मुंबईत खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राऊत यांनी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला.
दत्तक शहरात रस्त्यांची दैना
"नाशिक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक शहर आहे आणि मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमधील प्रमुख आहेत. असे असतानाही नाशिकमधील रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, तसेच खड्डे बुजविण्याचे कामही सुरू झालेले नाही," असा थेट आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी शिवसेनेच्या सर्व माजी नगरसेवकांनी महापालिकेत हाताला आणि डोक्याला प्रातिनिधिक स्वरूपात बँडेज बांधून अनोखे आंदोलन केले. किमान आतातरी प्रशासनाने शहरातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
६ जणांचा मृत्यू, ५-६ जण कोमात: संजय राऊत
खासदार राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना सांगितले की, "मुख्यमंत्री फडणवीस हे नाशिकला कधी विमानाने तर कधी हेलिकॉप्टरने जातात. परंतु, सामान्य जनतेने मात्र खड्ड्यांत पडून जखमी व्हायचे का? नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत ६ लोकांचा मृत्यू झाला असून ५ ते ६ जण कोमात आहेत. असे असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना याचे कोणतेही गांभीर्य नाही."
कुंभमेळ्यातील साधू-महंतांवरून सरकारला सवाल
आगामी कुंभमेळ्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, "कुंभमेळ्यात जे साधू-महंत नाशिकमध्ये येणार आहेत, त्यांनीही या खड्ड्यांत पडायचे का? त्यांना खड्ड्यांतून प्रवास करायला लावणार आहात का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नाशिकमध्ये होणारे आगामी आंदोलन हे सरकारचा नाकर्तेपणा, महापालिका आयुक्त, प्रशासन आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात असेल, असा इशाराही राऊत यांनी दिला. हे आंदोलन इतके मोठे असेल की महाराष्ट्रातील सर्व खड्डे त्यात भरले जातील, असा दावाही त्यांनी या वेळी केला.