नाशिक, (प्रतिनिधी) १० ऑगस्ट - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ला फिरून माघारी परतणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा पाठलाग करून तुफान तोडफोड आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कट मारल्याचा क्षुल्लक बहाणा करत संशयितांनी हे कृत्य केले असून, या प्रकरणी १० जणांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ४ आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
नेमका प्रकार काय?
कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील हिरेकनई येथील टेम्पो ट्रॅव्हलर चालक नागराज जगदीश गिरेगौड (वय २७) हे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन हरिहर किल्ला येथे पर्यटनासाठी आले होते. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास पर्यटन आटोपून त्र्यंबकेश्वर ते घोटी रस्त्याने जात असताना बोरीची वाडी येथे आरोपींनी वाहनाला कट मारल्याचा बहाणा करत उगाचच वाद उकरून काढला.
त्यानंतर आरोपींनी बेकायदेशीर टोळके जमवून हातात काठ्या व दगड घेऊन पर्यटकांच्या Tempo Traveller (क्र. KA-01 AD-0056) गाडीचा मोटरसायकलने पाठलाग केला. वावी हर्ष येथे गाडी अडवून चालक व साक्षीदारांना काठीने आणि हाताच्या चापटीने बेदम मारहाण केली.
गाडीची तुफान तोडफोड व जिवे मारण्याची धमकी
हल्ल्यादरम्यान संशयितांनी पर्यटकांच्या गाडीवर दगडफेक करत पुढील काच, उजव्या बाजूचा आरसा फोडला. तसेच काठी व दगडांच्या साहाय्याने गाडीचे छताचे व मागील बंपरचे मोठे नुकसान केले. आरोपींनी पर्यटकांना वाईट भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली.
१० जणांवर गुन्हा; ४ आरोपी जेरबंद
या घटनेप्रकरणी चालक नागराज गिरेगौड यांच्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १८९(२), १९०, १९१(१), १९१(२), ११८(१), ११५(२), ३२४(५), १२७(२), ३५१(२), ३५२ आणि दंगा/दुखापत अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्ह्यातील आरोपींची नावे:
१. अजय चंदर जाधव (वय २४)
२. आकाश दिलीप जाधव (वय १९)
३. अक्षय देवराम जाधव (वय २२)
४. देविदास मधुकर जाधव (वय १९)
५. अमोल जाधव
६. गोपाळ जाधव
७. राहुल जाधव
८. दत्ता लोणे
९. साहील जाधव
१०. साई जाधव (सर्व रा. बोरीचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक)
पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पोउपनि भिंगारदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत पोलिसांनी अजय जाधव, आकाश जाधव, अक्षय जाधव आणि देविदास जाधव या चार आरोपींना अटक केली असून, पुढील तपास पोहवा/१८८८ गोवर्धने करत आहेत.