दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १० ऑगस्ट - शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी (१० ऑगस्ट) द्वारका चौक, मुंबई नाका आणि त्र्यंबक रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीनंतर द्वारका चौकातील नाशिक-धुळे मार्ग आणि त्र्यंबक रस्त्यावरील एक बाजू ३१ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
पाहणी आणि महत्त्वाचे निर्देश:
द्वारका चौक (नाशिक-धुळे मार्ग): द्वारका चौकात एमएसआयडीसी (MSIDC) मार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. ३१ ऑगस्टपर्यंत नाशिक-धुळे दिशेने जाणारी वाहतूक सुरू करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश शेखर सिंह यांनी दिले.
त्र्यंबक रस्ता (मुंबई नाका ते एबीबी सर्कल): या मार्गावरील पॅचवर्कची कामे तातडीने पूर्ण करून, खड्डे बुजवून ३१ ऑगस्टपर्यंत एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई नाका ते खडकाळी सिग्नल: मुंबई नाका ते गडकरी सिग्नल आणि पुढे खडकाळी सिग्नलपर्यंतच्या रस्त्याचे काम वेगाने हाती घेऊन नवरात्रोत्सवापूर्वी एक मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
वाहतूक वॉर्डनची संख्या वाढवणार: कामांच्या ठिकाणी आणि पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कंत्राटदार व पोलिसांच्या समन्वयाने अतिरिक्त वाहतूक वॉर्डन तैनात केले जाणार आहेत.
या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर बारवकर, प्राधिकरणाचे उपआयुक्त योगेंद्र चौधरी, पोलिस उपायुक्त (परिमंडळ १) मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त माधव रेड्डी यांसह एमएसआयडीसी, महापालिका आणि एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
“शहराच्या दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थेसाठी ही कामे आवश्यक आहेत. मात्र, काम सुरू असताना नागरिकांना होणारा तात्पुरता त्रास कमी करणेही महत्त्वाचे आहे. दिलेली कालमर्यादा पाळून टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत केली जाईल.”
— शेखर सिंह (आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण)
“पायाभूत सुविधांची कामे आणि वाहतूक व्यवस्थापन यांचा समन्वय साधणे गरजेचे आहे. दिलेल्या मुदतीत रस्ते खुले करण्यासह खड्ड्यांसारख्या तातडीच्या समस्यांवर प्राधान्याने कार्यवाही केली जाईल.”
— मनीषा खत्री (महापालिका आयुक्त, नाशिक)