येवला, (प्रतिनिधी) १० ऑगस्ट - मांजरपाडा प्रकल्प हा येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागासाठी केवळ सिंचनाचा प्रकल्प नसून दुष्काळमुक्तीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सलग तिसऱ्या वर्षी मांजरपाड्याचे पाणी डोंगरगाव साठवण तलावात पोहोचले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. येवल्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्याचा आमचा निर्धार असून त्यासाठी पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून अधिकचे पाणी मांजरपाडा प्रकल्पात अधिकचे पाणी उपलब्ध करण्यात येणार असून येवल्यासह मराठवाड्यापर्यंत हे पाणी पोहचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी साकारण्यात आलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी सलग तिसऱ्या वर्षी डोंगरगाव साठवण तलावात दाखल झाले. या जलप्रवाहाचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, शहराध्यक्ष दत्ता निकम, येवला बाजार समितीचे माजी सभापती किसन धनगे, येवला नगरपालिकेचे गटनेते दीपक लोणारी, मकरंद सोनवणे, संध्या पगारे, भागवत सोनवणे, मंगेश जाधव, नगरसेवक गोटू मांजरे, अमोल शिंदे, मच्छिंद्र थोरात, अशोक कुळधर, विजय जेजुरकर, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, भागीनाथ पगारे, देविदास निकम, संजय पगारे, अंबादास पगार, यमाजी शेलार, बाबुराव सोमासे, पांडुरंग राऊत, भूषण लाघवे, सुमित थोरात, दिपक गायकवाड, नवनाथ थोरात, सोहेल मोमिन, सचिन सोनवणे, नितीन आहेर, भाऊसाहेब धनवटे, भगवान ठोंबरे, महेश गादेकर, नवनाथ पोळ, दीपक पवार, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्पातील सर्व गेट तसेच अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून, यंदा अगदी कमी कालावधीत प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचले आहे. या पाण्यामुळे येवला तालुक्यातील दुष्काळग्रस्त उत्तरपूर्व भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही मोठा आधार मिळणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने परिसरातील शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून येवल्याच्या दुष्काळी भागाला दिलासा मिळाला असला, तरी एवढ्यावरच न थांबता भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन व्यापक नियोजन करण्यात येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नार-पार प्रकल्पाला गती देऊन त्यातून उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी येवल्यासह मराठवाड्याच्या दुष्काळी भागापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब दुष्काळी भागाच्या विकासासाठी उपयोगात आणण्याचे उद्दिष्ट असून, त्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागाला अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पावसाचे अनिश्चित प्रमाण, भूजल पातळीत होणारी घट आणि सिंचनाच्या मर्यादित सुविधा यामुळे शेतकऱ्यांसमोर सातत्याने अडचणी निर्माण होत होत्या. ही परिस्थिती बदलण्यासाठी मांजरपाडा प्रकल्पासह विविध जलसंधारण व सिंचन प्रकल्पांना चालना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी उपलब्ध झाले तर शेतीला बळ मिळते, शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळते आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते. त्यामुळे येवल्याला दुष्काळाच्या संकटातून कायमस्वरूपी बाहेर काढणे हा आमचा प्रमुख संकल्प आहे. मांजरपाडा, पार गोदावरी आणि इतर जलप्रकल्पांच्या माध्यमातून येवल्याच्या प्रत्येक दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील,” असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मांजरपाड्याचे पाणी डोंगरगाव साठवण तलावात दाखल झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत जलपूजनाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.