दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ७ ऑगस्ट - शिक्षणाचा झालेला प्रचंड बाजार, NEET परीक्षेतील पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांचे होणारे शोषण यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. नाशिक दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभारावर आणि ढासळत्या शिक्षण व्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला.
दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन ही केवळ सुरुवात
दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, "जंतरमंतरवर जमलेले तरुण-तरुणी हे केवळ NEET घोटाळ्याने त्रस्त नव्हते, तर एकूणच व्यवस्थेच्या भोंगळ कारभाराने वैतागलेले होते. हे आंदोलन आता घराघरांत पोहोचले आहे. जेव्हा आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाण झाली, तेव्हा प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला मारल्यासारखी वेदना झाली. जंतरमंतरवरचे हे आंदोलन भविष्यातील मोठ्या असंतोषाची ही केवळ सुरुवात आहे."
कोचिंग क्लासेसचा धंदा अन् कॉलेजचे अर्थकारण
शिक्षणाच्या वाढत्या धंदेवाईक वृत्तीचा पाढा वाचताना त्यांनी सांगितले की, "दहावीची परीक्षा झाली की मुले आधी कोचिंग क्लास लावतात आणि मग ते क्लासेस ठरवतात की मुलांनी कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा. क्लासेसची फी १ लाख ४० हजार रुपये आणि कॉलेजची फी अवघी २० हजार रुपये, ही काय शिक्षण व्यवस्था आहे? वर्गात ८-८ तास क्लासला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हजेरी कशी मिळते? यात नक्कीच मोठे अर्थकारण शिजत आहे." NEET चे पेपर कोचिंग क्लासेसकडूनच फुटल्याचा थेट आरोप करत, सरकारने आणि नंदन निलेकणी यांनी सर्वात आधी या क्लासेसच्या मनमानीवर वेसण घालावी, अशी मागणी त्यांनी केली.
यश गोसावीच्या आत्महत्येवरून पालकमंत्र्यांवर निशाणा
NEET च्या नैराश्यातून नाशिकमधील यश गोसावी या तरुणाने आत्महत्या केली. त्याच्या पालकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर बोलताना राज ठाकरे भावुक झाले; "ज्या २१ मुलांनी आत्महत्या केली, त्यांच्या यादीत आपल्या जिल्ह्यातील या मुलाचे नावही नाही. असा तरुण गमावल्यानंतरही स्थानिक पालकमंत्र्यांना त्याची कोणतीही सहानुभूती वाटू नये, यापेक्षा दुर्दैव ते काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लाखांवरून कोटींवर गेलेला पेपरफुटीचा दर
"वर्तमानपत्रांत पानपानभर क्लासेसच्या जाहिराती छापून येतात. पहिल्यांदा जेव्हा NEET चा पेपर फुटला तेव्हा २५ लाखांचा रेट ऐकायला आला होता, आता तो थेट दीड कोटींवर पोहोचला आहे. देशातील तरुण मोबाईलवर बाहेरील जगाची प्रगती पाहतात आणि इथली परिस्थिती अनुभवतात, तेव्हा त्यांना नैराश्य येणे स्वाभाविक आहे. ज्या शिक्षण मंत्र्यांच्या आणि सरकारमधील मंत्र्यांची मुलेच परदेशात शिकतात, त्यांचा या देशातील शिक्षण पद्धतीवर विश्वास उरलेला नाही," असा घणाघात त्यांनी केला.
?s=20