मुंबई, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष आढावा बैठकीत प्रशासनाला कडक शब्दांत तंबी दिली आहे. "लोकांना कारणे सांगू नका, त्यांना रस्त्यांच्या समस्येतून दिलासा द्या; आता रिलॅक्स राहून चालणार नाही," अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपला संताप व्यक्त केला. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली.
खड्डे न बुजवल्यास कंत्राटदारांचे बिल थांबवण्याचे आदेश
रस्त्यांच्या दुरवस्थेवर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले. खड्डे बुजवणे आणि रस्ते दुरुस्तीच्या कामात दिरंगाई झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर थेट दंडात्मक कारवाई करावी. तसेच, कामे वेळेत आणि दर्जात्मक न झाल्यास संबंधित यंत्रणांची पुढील कामे तसेच बिले त्वरित रोखण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.
गुजराती कंत्राटदारांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याची कामे 'गुजराती कंत्राटदारांना' दिल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. देशात किंवा राज्यात कंत्राटे देताना जात, धर्म किंवा भाषा पाहिली जात नाही. ज्यांची बिड कॅपॅसिटी (पात्रता) असते, त्यांनाच स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे आणि पारदर्शकपणे कंत्राट मिळते. कंत्राटदारांच्या मागे कोण आहे हे पाहिले जात नाही. शिवाय कामाच्या गुणवत्तेसाठी तीन स्तरांवर तपासणी (Quality Checks) ठेवली असून ती पूर्ण झाल्यावरच पैसे दिले जातील."
नाशिक महापालिकेत उद्या विशेष महासभा
शहरातील खड्ड्यांमुळे नाशिककरांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी नाशिक महानगरपालिकेची 'विशेष महासभा' केवळ खड्ड्यांच्या मुद्द्यावरच पार पडणार आहे. या सभेत विरोधक सत्ताधारी भाजपला जोरदार धारेवर धरण्याची चिन्हे आहेत.
?s=20