येवला, (प्रतिनिधा) ७ ऑगस्ट - विणकरांच्या सामाजिक सुरक्षा, आरोग्य, विमा, शिक्षण आणि कल्याणाशी संबंधित प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. महिलांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. अनेक कुटुंबांमध्ये महिलांच्या परिश्रमामुळे पैठणी उद्योगाला बळ मिळाले आहे. लोकल ते ग्लोबल या संकल्पनेनुसार येवला पैठणीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया. पैठणी हा केवळ व्यवसाय नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा अभिमान आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण छगन भुजबळ यांनी केले.
राष्ट्रीय विणकर दिनानिमित येवल्यात महाराष्ट्र वस्त्रोद्योग समितीचे अशासकीय सदस्य मनोज दिवटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवल्याचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, अमृता पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव पवार, प्रमोद सस्कर, बंडू क्षिरसागर, सोनी पैठणीचे श्रीनिवास सोनी,भांडगे पैठणीचे संचालक राजेश भांडगे, कापसे फाऊंडेशनचे दिलीप खोकले, रमाकांत भावसार, मयूर मेघराज, यांच्या सोबत येवल्याचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांच्यासह विणकर बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विणकरांच्या कलेची दखल घेऊन ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हॅन्डलूम डे म्हणून घोषित केलेला आहे. प्रत्येक विणकराचा सन्मान राखणे, त्यांच्या कष्टांना योग्य मोबदला मिळवून देणे आणि पैठणी परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, हीच जागतिक विणकर दिनाची खरी भावना आहे. राज्यातील विणकर समाजाची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी विणकर समाजाच्या व लोकांचा विकास करण्याच्या दृष्टीने विणकर समाज आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, इतिहासात अनेक ठिकाणी नोंदी आहेत जिथे जिथे वस्रोद्योग वाढीला लागला तिथे तिथे औद्योगिक क्रांती देखील झाली.सन २००४ साली येवल्यात पैठणीचे फक्त तीन दुकाने होती. आता सुमारे ४०० हून अधिक दुकाने सुरु आहे. यातून पैठणी विणकरांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. येवला शहरात आजमितीस ३० गावांमध्ये साधारण १२ हजाराहून जास्त विणकर पैठणी साडी हाताने विणण्याचे कामकाज करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महायुती सरकारने विणकरांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. राज्य शासनाकडून एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत हातमाग विणकरांना उत्सव भत्ता देण्यात येत आहे.यामध्ये पुरुष विणकर यांना प्रति पूरूष दहा हजार रुपये तर महिला विणकर यांना प्रति महिला विणकर पंधरा हजार रुपये उत्सव भत्ता दिला जात आहे. २०० युनिट पर्यंत विज मोफत दिली जाते. रेशीम खरेदीवर राज्य सरकार १५% आणि केंद्र सरकार १५% याप्रमाणे ३०% सवलत दिली जाते. केंद्र शासनाकडून सुद्धा वर्क शेड आणि हातमागावर अनुदान दिले जाते. तसेच पारंपारिक विणकरांचे सर्वेक्षण करून त्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे नोंदणी करून ओळखपत्र देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, येवला म्हणजे पैठणीचे माहेरघर. येथे विणली जाणारी पैठणी ही केवळ साडी नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि कलेचा अमूल्य वारसा आहे.
अनेक पिढ्यांपासून येवला येथील विणकरांनी आपल्या कष्ट, संयम आणि कलाकौशल्याने पैठणीला देश-विदेशात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. प्रत्येक पैठणीमागे विणकराचे अनेक दिवसांचे श्रम, कल्पकता आणि समर्पण दडलेले असते. या श्रमांना आज आपण आदरपूर्वक सलाम करतो. यंत्रनिर्मित वस्तूंच्या स्पर्धेतही हातमागावरील पैठणीने आपली ओळख कायम ठेवली आहे. हीच आपल्या विणकरांच्या गुणवत्तेची खरी पावती आहे. नव्या पिढीनेही हा पारंपरिक व्यवसाय स्वीकारावा यासाठी आधुनिक प्रशिक्षण, तंत्रज्ञान, डिझाईन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
विणकरांना कच्चा माल, कर्ज, विपणन, ई-कॉमर्स, प्रदर्शनांमध्ये सहभाग आणि निर्यातीच्या संधी अधिक उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येवला पैठणीचा जागतिक स्तरावर अधिक प्रचार-प्रसार व्हावा, देश-विदेशातील पर्यटकांनी येवल्याला भेट द्यावी आणि विणकरांना त्याचा थेट आर्थिक लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.