कुंभमेळ्याच्या नावाखाली फक्त कमिशनबाजी आणि... नाशिकमध्ये राज ठाकरे बरसले...

Share:
Main Image
Last updated: 07-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकार, नाशिक प्रशासन आणि शैक्षणिक व्यवस्थेवर जोरदार निशाणा साधला. कुंभमेळ्याच्या कामात होत असलेली कथित कमिशनबाजी, NEET परीक्षेतील गैरप्रकार, शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि खेळाडूंच्या भेटीबाबत निर्माण झालेला गैरसमज या सर्व विषयांवर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.  

कुंभमेळ्यातून फक्त कमिशन कमवण्याचा धंदा
२००३ आणि २०१५ च्या कुंभमेळ्याच्या आठवणी सांगताना राज ठाकरे म्हणाले, "२०१५ च्या कुंभमेळ्याची कामे आणि नियोजन अत्यंत सोप्या व सहज पद्धतीने झाले होते. उत्तम रस्ते अन् पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, कारण त्यामागे कोणतीही कमिशनखोरीची मनीषा नव्हती. मात्र, आगामी कुंभमेळ्याच्या नावाने सध्या जे काही सुरू आहे, त्यातून सत्ताधाऱ्यांना फक्त कमिशन कमवायचे आहे. यातील बहुतेक कंत्राटदार गुजरातचे आहेत. सरकारला रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंशी काहीही देणेघेणे उरलेले नाही," असा गंभीर आरोप त्यांनी केला. मनसेच्या कार्यकाळात सुंदर केलेले नाशिक, बोटॅनिकल गार्डन आणि बाळासाहेबांचे स्मारक यांची दुरवस्था केल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.  

NEET घोटाळा आणि कोचिंग क्लासेसचे अर्थकारण
शिक्षणाच्या वाढत्या धंदेवाईक वृत्तीवर बोट ठेवत ते म्हणाले, "दहावीच्या परीक्षेनंतर मुलं कॉलेजऐवजी आधी क्लासेस लावतात. कोचिंग क्लासेसची फी १ लाख ४० हजार आणि कॉलेजची फी २० हजार रुपये, असा प्रकार सुरू आहे. वर्गात ८-८ तास क्लासला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हजेरी कशी मिळते? यात नक्कीच काहीतरी मोठे अर्थकारण आहे." NEET परीक्षेचा पेपर फुटण्यात कोचिंग क्लासेसचाच हात असल्याचा आरोप करत, सरकारने आणि नंदन निलेकणी यांनी या क्लासेसवर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी त्यांनी केली. नाशिकमधील NEET च्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या यश गोसावी या तरुणाच्या पालकांनी भेट घेतल्याचा उल्लेख करत राज यांनी पालकमंत्र्यांच्या संवेदनहीनतेवरही टीका केली.  

Advertisement

खेळाडू दिलीप गावित यांच्या भेटीबाबत दिलगिरी
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू दिलीप गावित यांच्याशी भेट न झाल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण देताना राज ठाकरे म्हणाले, "गावित भेटायला आले आहेत, याची मला कल्पनाच नव्हती; कोणी मला तशी माहिती दिली नाही. मला कळले असते तर मी नक्कीच भेटलो असतो. या गैरसमजाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ते सध्या दिल्लीला गेले असून नाशिकमध्ये परतताच मी स्वतः त्यांची भेट घेईन."  

भाजपमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे केवळ परीक्षा पुरते मर्यादित नसून एकूणच व्यवस्थेविरोधातील असंतोषाचा उद्रेक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, "बाहेरचे शत्रू संपवले की पक्षातच अंतर्गत शत्रू तयार होतात, हा इतिहास आहे; सध्या भाजपमध्ये तोच अंतर्गत सत्तासंघर्ष सुरू आहे," असा टोलाही त्यांनी लगावला. देशातील शिक्षण व्यवस्थेवर सत्ताधाऱ्यांचाच विश्वास नसून केंद्रीय मंत्र्यांची मुले परदेशात शिकत असल्यावर त्यांनी ताशेरे ओढले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.