मनोहर शिंदे, (नाशिक) ७ ऑगस्ट - आगामी सिंहस्थ कुंभमेळा, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होत आहे. 'मित्रा' (MITRA), जागतिक बँक, राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त उच्चस्तरीय बैठकीत नाशिकमध्ये स्मार्ट आणि डिजिटल आपत्ती व्यवस्थापन प्रणाली उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
महाराष्ट्र रेझिलिअन्स अँड डिझास्टर प्रोजेक्ट (MRDP) अंतर्गत डिसेंबर २०२६ पर्यंत नाशिकमध्ये अत्याधुनिक 'जिल्हा आपत्कालीन संचालन केंद्र' (DEOC) उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:
मोबाईल व फील्ड डीईओसी: घटनास्थळावरूनच तात्काळ निर्णय घेता यावेत यासाठी 'मोबाईल डीईओसी' आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर येथे 'फील्ड डीईओसी' उभारण्यात येईल.
डिजिटल समन्वयावर भर: रिअल-टाइम रिसोर्स मॅनेजमेंटसाठी IDRN, ICT आणि IEMS या आधुनिक डिजिटल प्रणालींचे एकत्रीकरण केले जाईल.
हवामान अंदाज प्रणाली (IMD API): कुंभमेळ्यातील गर्दी व आपत्कालीन नियोजनासाठी भारतीय हवामान विभागाच्या (IMD) यंत्रणेशी थेट API इंटीग्रेशन केले जाणार आहे.
भूकंप अभ्यासासाठी नवी उपकरणे: सुरगाणा, दिंडोरी, कळवण आणि पेठ या तालुक्यांतील भूकंपाच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक साधने बसवली जातील. तसेच 'पीएम आवास' अंतर्गत भूकंपरोधक बांधकामांवर भर दिला जाईल.
"आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी आंतरविभागीय समन्वयाद्वारे नागरिकांचे जीवित व वित्त नुकसान शून्य किंवा अत्यल्प ठेवणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय आहे."
— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक
या बैठकीला जागतिक बँकेचे प्रतिनिधी अनुप करंथ, 'मित्रा'चे प्रतिनिधी होसाळीकर व श्रीनाथ, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
?s=20