मुंबई, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षक पदांची भरती पारदर्शक व गुणवत्ताधारित पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. यांतर्गत राज्यभरातील एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडली होती. या चाचणीला बसलेल्या उमेदवारांपैकी १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र (Self-declaration) प्रक्रिया पूर्ण केली आहे.
पदभरतीचा मुख्य तपशील:
एकूण पदे: ३०,२०९ पदे (१९,८८१ पदे मुलाखतीशिवाय, तर खाजगी संस्थांमधील १०,३२८ पदे मुलाखतीसह भरली जाणार).
विभागनिहाय पदे:
जिल्हा परिषदा: १३,३५१
महानगरपालिका: १,९५४
नगर पालिका / परिषदा: २८०
खाजगी शैक्षणिक संस्था: १२,१४८
आदिवासी विकास विभाग (शासकीय शाळा): २,४२१
शासकीय विद्यानिकेतन: ५६
इयत्तानिहाय पदे:
पहिली ते पाचवी: १४,३२० पदे
सहावी ते आठवी: १०,०१२ पदे
नववी व दहावी: ५,५१३ पदे
अकरावी व बारावी: ३६४ पदे
उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती व वेळापत्रक:
प्राधान्यक्रम (Preferences) नोंदवणे: उमेदवारांना पदभरतीसाठी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या अधिकृत संकेतस्थळावर ६ ऑगस्ट २०२६ पासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अंतिम मुदत: उमेदवारांनी आपले पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून ते ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत लॉक करणे अनिवार्य आहे. यानंतर मुलाखतीशिवाय असलेल्या पदांसाठी थेट गुणवत्तायादी (Merit List) प्रसिद्ध केली जाईल.
तक्रार किंवा मदतीसाठी: पदभरती प्रक्रियेशी संबंधित सूचना किंवा तक्रारींसाठी उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण आयुक्तांनी केले आहे.