शेतकऱ्यांना चीन आणि युरोपात अभ्यास दौऱ्याची संधी... असा घ्या लाभ...

Share:
Main Image
Last updated: 05-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ ऑगस्ट - जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासोबतच शेतमालाचा दर्जा सुधारणे आणि जगात विकसित होत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागामार्फत २०२६-२७ या वर्षासाठी 'शेतकऱ्यांचे देशाबाहेर दौरे' ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरोप आणि चीन येथे अभ्यास दौऱ्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

युरोप आणि चीनमध्ये अभ्यास दौरा

सन २०२६-२७ या वर्षात युरोपमध्ये फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन, तर चीनमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढवण्याची तंत्रे आणि कृषी एक्स्पोचा अभ्यास करण्यासाठी हे दौरे आयोजित केले जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी एकूण ५ लाभार्थ्यांची निवड केली जाईल. यामध्ये किमान एक महिला शेतकरी, राज्य किंवा केंद्र शासनस्तरीय कृषी पुरस्कारप्राप्त/पीक स्पर्धा विजेते शेतकरी तसेच इतर पात्र शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे.

शासनाकडून ५० टक्के अनुदान

या योजनेअंतर्गत सरकारकडून अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल २ लाख रुपये (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) अनुदान दिले जाणार आहे.

अशा आहेत अटी व पात्रता:

अर्जदार स्वतः शेतकरी असणे आणि अ‍ॅग्रीस्टॅक (AgStack) फार्मर आयडी असणे आवश्यक.

Advertisement

शेती हेच मुख्य उत्पन्नाचे साधन असावे आणि वय निवडीच्या दिवशी किमान २५ वर्षे पूर्ण असावे.

किमान १ वर्ष वैधता असलेला पासपोर्ट आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक.

एका शेतकरी कुटुंबातून (पती, पत्नी व १८ वर्षांखालील मुले) केवळ एकाच व्यक्तीस लाभ मिळेल.

अर्जदार शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खासगी संस्थेतील नोकरदार, डॉक्टर, वकील, सीए, अभियंता किंवा कंत्राटदार नसावा. तसेच पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे:

अर्जासोबत फार्मर आयडीचा पुरावा, पासपोर्टच्या पहिल्या पानाची साक्षांकित प्रत, ओळखपत्र/आधार कार्ड, शिधापत्रिका, वैद्यकीय प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र व हमीपत्र, आणि पुरस्कार किंवा पीक स्पर्धा विजेते असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.

नाशिक जिल्हा फलोत्पादन व भाजीपाला उत्पादनात राज्यात आघाडीवर असल्याने, परदेशातील अत्याधुनिक प्रक्रिया, सेंद्रिय शेती व निर्यातीच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी प्रगतशील, महिला व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.