नाशिक, (प्रतिनिधी) ४ ऑगस्ट - राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत नाशिक जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील ३५ हजार ८९० पात्र खातेदारांपैकी तब्बल २७ हजार २८३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. उर्वरित ८ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी तातडीने ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
६८ हजारहून अधिक खात्यांची माहिती पोर्टलवर
या योजनेसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत (NDCC) २३,७९८ आणि राष्ट्रीयकृत बँकांमार्फत ४५,०६१ अशा एकूण ६८,८५९ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेचे १८,४५३ आणि राष्ट्रीयकृत बँकांचे १७,४३७ असे एकूण ३५,८९० पात्र खातेदारांची पहिली यादी शासनाकडून प्राप्त झाली आहे.
२ ऑगस्ट २०२६ अखेर प्राप्त यादीतील २७,२८३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश सर्व बँका व जिल्हा अग्रणी व्यवस्थापकांना (LDM) देण्यात आले आहेत.
'आपले सरकार' केंद्रांवर मोफत ई-केवायसी
आधार प्रमाणीकरणाची सुविधा जिल्ह्यातील सर्व 'आपले सरकार' आणि 'महा-ई-सेवा' केंद्रांवर मोफत उपलब्ध आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, त्यामुळे कोणीही पैसे देऊ नयेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
१५ ऑगस्टनंतर दुसरी यादी; नव्याने पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा
योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी १५ ऑगस्टनंतर प्रसिद्ध केली जाईल. ई-केवायसी पूर्ण होताच थकीत कर्जाची रक्कम थेट खात्यात जमा होणार असल्याने चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळणे सुलभ होईल. पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँक शाखा, सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात उपलब्ध आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप 'ॲग्रीस्टॅक' (AgriStack) नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी. काही अडचणी असल्यास तालुका कृषी अधिकारी, सेवा संस्थेचे गटसचिव किंवा बँक निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले आहे.