नाशिक, (प्रतिनिधी) ४ ऑगस्ट - शहरातील रस्त्यांवरील खड्डे आता केवळ प्रवाशांच्या गैरसोयीचा विषय राहिलेला नसून नागरिकांच्या जीवावर बेतणारा अत्यंत गंभीर प्रश्न बनला आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या प्राणघातक अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने त्यांच्या कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे. या पार्श्वभूमीवर, खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची सानुग्रह मदत व महापालिकेत नोकरी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोर्टाच्या निकालाचा दिला दाखला
आपल्या निवेदनात बंटी तिदमे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचा दाखला दिला. उच्च न्यायालयाने 'सु-मोटो जनहित याचिका क्र. ७१/२०१३' मध्ये १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार, रस्त्यावरील खड्डे किंवा मॅनहोल अपघातात नागरिकाचा मृत्यू झाल्यास संबंधित महानगरपालिकेने पीडित कुटुंबाला प्रथम ६ लाख रुपये भरपाई देणे बंधनकारक आहे. नंतर ही रक्कम दोषी अधिकारी किंवा कंत्राटदारांकडून वसूल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच जखमींना ५० हजारांपासून २.५ लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आदेश आहेत.
'१० लाखांची मदत अन् एकाला मनपा नोकरी'
वाढती महागाई आणि कुटुंबातील मुख्य कमावत्या व्यक्तीचा आधार गमावल्यामुळे निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती लक्षात घेता केवळ ६ लाखांची किमान भरपाई पुरेशी नाही, असे तिदमे यांनी स्पष्ट केले. मनपाने विशेष बाब म्हणून स्व. प्रभाकर निकम, स्व. प्रवीण गायकवाड, स्व. दीपाली बेळे आणि स्व. नीलेश कोतकर यांच्या पीडित कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि कुटुंबातील एका सदस्याला नाशिक महापालिकेत नोकरी द्यावी, असा आग्रह त्यांनी धरला.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:
खड्ड्यांमुळे मृत झालेल्यांच्या कुटुंबास ₹१० लाखांची मदत व एका सदस्याला मनपाची नोकरी.
सर्व धोकादायक रस्ते व खड्ड्यांच्या ठिकाणी तातडीने बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर्स, इशारा फलक आणि प्रकाशव्यवस्था करणे.
शहरातील सर्व खड्डे युद्धपातळीवर बुजवून निकृष्ट कामास जबाबदार असणारे अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करणे.
"नागरिकांच्या जीवापेक्षा कोणताही विकास मोठा असू शकत नाही. सुरक्षित व खड्डेमुक्त नाशिक घडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने संवेदनशील पावले उचलून पीडितांना न्याय द्यावा," असे आवाहन प्रविण (बंटी) तिदमे यांनी केले आहे.