मुंबई , (प्रतिनिधी) ३ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठी भेट जाहीर केली आहे. राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी ज्या आरोग्य संस्थांचे काम ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले होते, त्यांना युद्धपातळीवर पूर्ण करून १५ ऑगस्ट रोजी विक्रमी संख्येने लोकार्पण करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवेला मोठी ताकद मिळणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
नेमक्या कोणत्या सुविधा दाखल होणार?
राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ट्रॉमा केअर युनिट आणि स्त्री रुग्णालये यांसारख्या विविध आरोग्य सुविधा यानिमित्ताने थेट नागरिकांच्या सेवेत रुजू होत आहेत.
उद्घाटनासाठी सज्ज प्रमुख ठिकाणे: जत, घनसावंगी, अंबड, बदलापूर, खर्डी, मोखाडा, डहाणू, सांगोला, कोंढाळ, ब्रह्मपुरी, वाडी (बु.), वाशीम आणि धुळे.
नवीन प्रकल्प कार्यरत होणारे जिल्हे: चंद्रपूर, धुळे, पुणे, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशीम, बुलढाणा आणि सोलापूर येथे आधुनिक ट्रॉमा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालये व प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहेत.
NHM व १५ व्या वित्त आयोगाचा निधी: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नागपूर, गडचिरोली, सांगली, सिंधुदुर्ग, नांदेड आणि वर्धा जिल्ह्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा
या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही.
अपघातग्रस्त रुग्ण, हृदयरुग्ण तसेच माता व बालकांना स्थानिक स्तरावरच तातडीचे व दर्जेदार उपचार वेळेत मिळतील.
आरोग्य कर्मचाऱ्यांनाही अत्याधुनिक सुविधांनी युक्त असा सुसज्ज कार्यपरिसर उपलब्ध होईल.
"आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प!"
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. ८० टक्क्यांहून अधिक काम झालेल्या रखडलेल्या संस्थांना प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय मैलाचा दगड ठरला आहे. उर्वरित संस्थांचे लोकार्पण लवकरच 'आरोग्य संवाद' यात्रेदरम्यान केले जाईल."
— प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री