सुरगाण्याची देशात उत्तुंग झेप... ३८८ वरून थेट ७७ व्या स्थानावर...

Share:
Main Image
Last updated: 01-Aug-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) १ ऑगस्ट - नीती आयोगाच्या 'आकांक्षित तालुका कार्यक्रमा'अंतर्गत (Aspirational Block Programme) नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याने देशात उल्लेखनीय यश मिळवले आहे. सर्वसमावेशक ३९ मूल्यांकन निर्देशकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुरगाण्याने देशातील ५१५ तालुक्यांच्या क्रमवारीत ३८८ व्या स्थानावरून थेट ७७ व्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे. प्रशासनाचे प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि समन्वित प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक टप्पा साध्य झाला आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सातत्यपूर्ण मॉनिटरिंगमुळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या साप्ताहिक आढावा बैठकांमुळे कामाला गती मिळाली. कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या (ITDP) प्रकल्प अधिकारी काश्मिरा संखे यांनी नोडल अधिकारी म्हणून या कार्यक्रमाचे यशस्वी समन्वयन केले आहे.

Advertisement

आरोग्य व पोषणात अव्वल कामगिरी:
सुरगाणा तालुक्याने विविध क्षेत्रांत राज्य आणि देशाच्या सरासरीपेक्षा सरस कामगिरी नोंदवली आहे:
आरोग्य व बालविकास: पहिल्या तिमाहीतील गरोदर महिला (ANC) नोंदणी ९७.५%, संस्थात्मक प्रसूती १००%, कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण केवळ ९.५%, तर क्षयरोगावर १००% यशस्वी उपचार.
तपासण्या: उच्च रक्तदाब तपासणी ८४.९% आणि मधुमेह तपासणी ९०.८%.
अंगणवाडी सुविधा: सर्व कार्यरत अंगणवाड्यांमध्ये १००% पिण्याचे पाणी आणि ९९.७% स्वच्छतागृहांची सोय.
कृषी व पशुसंवर्धन: जनावरांचे १००% एफएमडी लसीकरण आणि उद्दिष्टानुसार १००% शेतकरी उत्पादक कंपन्यांची (FPO) स्थापना.

अतिरिक्त ५ कोटींचा निधी अन् विशेष विकास आराखडा:
सुरगाण्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत यापूर्वी दिलेल्या ७ कोटींनंतर आता आणखी ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याचे निश्चित झाले आहे.
तसेच, जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, इगतपुरी, कळवण आणि त्र्यंबकेश्वर या ५ तालुक्यांसाठी विशेष 'तालुका विकास आराखडा' (Block Development Plan) तयार केला जाणार आहे. नोडल अधिकारी काश्मिरा संखे यांच्या नेतृत्वाखाली तयार होणाऱ्या या आराखड्याचा मुख्य उद्देश स्थानिकांचे जीवनमान उंचावणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने निर्माण करणे हा असणार आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रतिक्रिया:
"सुरगाणा तालुक्याने मिळवलेले यश हे सर्व शासकीय विभागांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. परिणामकारक अंमलबजावणी आणि लोककेंद्रित नियोजनाच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सुरगाणासह जिल्ह्यातील इतर आकांक्षित तालुक्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल."

Advertisement

Comments

No comments yet.