मनोहर शिंदे, नाशिक
भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करत अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी उद्या, शनिवार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
'या' तालुक्यांमध्ये शाळा-कॉलेज राहणार बंद:
मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या आठ तालुक्यांतील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, आश्रमशाळा तसेच सर्व महाविद्यालयांना (सरकारी व खासगी) १ ऑगस्ट रोजी सुट्टी असेल. शाळांना सुट्टी असली तरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या कामासाठी उपस्थित राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना व निर्बंध:
पर्यटनस्थळांवर बंदी
जिल्ह्यातील सर्व धबधबे, ट्रेकिंग पॉईंट्स, पर्यटनस्थळे, नदीकाठ व पूरप्रवण धार्मिक स्थळांवर नागरिकांना जाण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली असून ही क्षेत्रे 'प्रतिबंधित' घोषित करण्यात आली आहेत.
आठवडी बाजार व गर्दीचे कार्यक्रम रद्द
संबंधित आठ तालुक्यांमधील १ ऑगस्ट रोजी होणारे आठवडी बाजार, जत्रा, मेळावे आणि गर्दीचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.
एनडीआरएफ (NDRF) तैनात
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) तुकडी नाशिकमध्ये तैनात करण्यात आली आहे.
सुरक्षित स्थळी स्थलांतर:
पूरप्रवण व भूस्खलनाचा धोका असलेल्या सखल भागातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी अथवा निवारा केंद्रांत हलवण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
आरोग्य व आपत्कालीन सेवा सज्ज
सर्व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून पूरप्रवण क्षेत्रातील गरोदर महिलांना आधीच सुरक्षित आरोग्य केंद्रात दाखल करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आल्या आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका:
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी, नाले, ओढे व घाट परिसरात जाणे टाळावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ हवामान विभाग व प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.