खड्ड्यांवरून गिरीश महाजनांनी मागितली नाशिककरांची माफी... अधिकाऱ्यांना दिला हा अल्टिमेटम...

Share:
Main Image
Last updated: 31-Jul-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ३१ जुलै - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या दरम्याने नागरिकांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. शहरातील खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दैवी अपघातांची गंभीर दखल घेत, मंत्री महाजन यांनी शुक्रवारी (३१ जुलै) महापालिका मुख्यालयात तातडीची बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेची खरडपट्टी काढली. येत्या दोन ते तीन दिवसांत शहरातील १०० टक्के खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

या बैठकीस महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, स्मिता झगडे व वरिष्ठ पोलीस व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

नागरी सुरक्षेसाठी कडक सूचना

बैठकीत बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पाणी, गॅस पाइपलाइन, ड्रेनेज व फायबर केबलची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र, कामे करताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्यामुळे अपघात घडत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे.

पर्यायी मार्ग व दिशादर्शक: काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्ग, रिफ्लेक्टर (परावर्तित) सूचना फलक आणि मजबूत बॅरिकेड्स उभारण्यात यावेत.

अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी: सुरक्षेबाबत तक्रारी असलेल्या भागात अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी करून त्रुटी तातडीने दूर कराव्यात.

उद्योग क्षेत्रातील रस्ते: अंबड व सातपूर एमआयडीसी भागातील रस्ते दुरुस्तीची कामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

?s=20

Advertisement

नाशिककरांची माफी व निष्काळजीपणावर कारवाईचा इशारा

शहरातील खड्ड्यांमुळे नाशिककरांना सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाबद्दल मंत्री महाजन यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. तसेच, "कर्तव्यात कसूर करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकारी व निष्काळजी कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा त्यांनी दिला.

मृत नीलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांची भेट; ५ लाखांची मदत

अंबड परिसरात खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या दिवंगत नीलेश प्रल्हाद कोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.

खड्ड्यांमुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४ व्यक्तींच्या कुटुंबांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

मयत नीलेश कोतकर यांच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च स्वतः मंत्री गिरीश महाजन करणार असल्याचे त्यांनी घोषित केले.

विकासकामे आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही गोष्टी प्रशासनासाठी तितक्याच महत्त्वाच्या असून, पुढील २५ वर्षे नाशिककरांना चांगल्या रस्त्यांचा फायदा होईल अशा दर्जेदार सुविधा उभारण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.