एस.के. खेडकर, (नाशिक) ३१ जुलै - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी खोदलेले रस्ते आणि पावसाळ्यात निर्माण झालेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नाशिकमधील वातावरण चांगलेच तापले आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत ५ बळी गेल्यानंतर नागरिक, राजकीय पक्ष आणि व्यावसायिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेविरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडले आहे, तर दुसरीकडे संतप्त नागरिकांनी थेट आयुक्त व शहर अभियंत्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उद्या (शनिवारी) बैठकीचे आयोजन केले आहे.
'कामावर जाण्याऐवजी खड्ड्यांचे फोटो काढायचे का?'; नाशिककर आक्रमक
महापालिकेच्या कारभारावर सामान्य नाशिककरही संतप्त झाले आहेत. "रस्त्यांच्या दुरवस्थेची तक्रार करण्यासाठी जिओ-टॅग फोटो पाठवा," या महापौरांच्या आवाहनावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "पूर्ण शहरभर खड्डे असताना अधिकाऱ्यांनी स्वतः बाहेर पडून पाहणी करावी," अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर, 'एक नाशिककर' या नावाने सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले असून शनिवारी (१ ऑगस्ट) संध्याकाळी ६:३० वाजता कालिका मंदिर परिसरात नागरिक व सर्वसामान्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
'खड्डे बुजवा, नाशिक वाचवा'; राष्ट्रवादीचे जनआंदोलन
पाचव्या बळीनंतर नाशिक महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील रस्त्यांवर 'जनआंदोलन' आणि 'सही मोहीम' राबवण्यात आली. शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात "खड्डे बुजवा, नाशिक वाचवा" आणि "नाशिक जिल्हा, खड्ड्यांचा बालेकिल्ला" अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
रंजन ठाकरे यांचे गंभीर आरोप:
"सिंहस्थाच्या नावाखाली चांगले रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. महापालिका प्रशासन निधीची उधळपट्टी करत असून कंत्राटदार अतिशय निकृष्ट दर्जाची कामे करत आहेत. झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात अंबादास खैरे, संजय खैरनार, गटनेत्या सीमा ठाकरे, नगरसेविका जागृती गांगुर्डे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
औद्योगिक वसाहतीत दुरुस्ती सुरु
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील जीवघेण्या खड्ड्यांमुळे उद्योगांची लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी पार विस्कळीत झाली होती. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ('निमा') चे अध्यक्ष आशिष नहार यांनी हा विषय थेट मुख्यमंत्री कार्यालय आणि कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे लावून धरला.
'निमा'च्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालय व कुंभमंत्र्यांनी तात्काळ निर्देश दिल्यानंतर नाशिक महापालिकेने सातपूर व अंबड एमआयडीसीतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि महापौर हिमगौरी अडके यांनी तातडीने पावले उचलल्याबद्दल 'निमा'ने समाधान व्यक्त केले असून ही कामे उच्च दर्जाची आणि वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.